पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात एनएसएसच्या राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिरास प्रारंभ
‘एनएसएस’मुळे तरुणांना राष्ट्रसेवेची संधी: जोशी
सोलापूर, दि.17- राष्ट्रीय सेवा योजनेमुळे गाव-खेड्यात जाऊन काम करत असताना महाविद्यालयीन तरुण-तरुणींना समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रसेवेची संधी मिळते. पुढे यातूनच राष्ट्र सेवेची गोडी निर्माण होण्याबरोबरच स्वतःमधील नेतृत्व गुण विकसित होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध वृत्तनिवेदक सागर जोशी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 ते 21 मार्च 2025 या कालावधीत विद्यापीठामध्ये आयोजित प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध वृत्तनिवेदक सागर जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, प्र- कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे, डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ. वीरभद्र दंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी राज्यातील विविध कृषी, अकृषी, अभिमत विद्यापीठातील 200 विद्यार्थ्यांचा या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग असल्याचे सांगितले.

सागर जोशी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. समाजाचे प्रश्न जाणून घेण्याची संधी भेटते. यामुळे समाजाबरोबरच देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचे भाग्य यामुळे प्राप्त होते, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचे हे राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिर घेण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमता शासनाचे मी आभार मानतो. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस हिरवाईने नटलेले आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी पाच दिवस लाभ घ्यावा. चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे जावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले.