कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे उद्घाटन
गावात शेतमालावर आधारित उद्योगांची उभारणी केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – सहयोगी अधिष्ठाता डॉ दिलीप पवार
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये करावा. गावागावांमध्ये शेतमालावर आधारित उद्योगांची उभारणी झाली तर अनेक युवकांना रोजगाराच्या संधीबरोबरच व्यवसायाच्याही संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ दिलीप पवार यांनी केले. तांदुळनेर ता राहुरी येथे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ दिलीप पवार बोलत होते. यावेळी अन्न शास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ विक्रम कड, सरपंच बेलकर, माजी सरपंच साबळे, शिवचरीत्रकार जालिंदर नाईकवाडी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ कैलास कांबळे, डॉ वीरेंद्र बारई, डॉ एस बी गडगे व डॉ सुनील फुलसावंगे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कैलास कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये पुढील सहा दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगीतली. डॉ. फुलसावंगे यानी शिस्तपालनाचे जीवनातील महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद उबाळे याने तर आभार ज्ञानेश्वरी ह्याळीज यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक मेहेत्रे, शेतकरी व राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० स्वयंसेवक उपस्थित होते.