उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कवयित्री बहिणाबाई संशोधन फेलोशिप केली सुरू
जळगाव दि. १९ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा अंतर्गत पूज्य साने गुरूजी संशोधन फेलोशिप, कवयित्री बहिणाबाई संशोधन फेलोशिप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन फेलोशिप यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. दि. १८ जुलै रोजी झालेल्या विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत रिसर्च फेलोशिपसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीला मान्यता देण्यात आली. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियमावली तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या तिन्ही फेलोशिपसाठी विद्यार्थी पीएच.डी साठी नोंदणी झालेला आवश्यक आहे. संशोधनाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज, पूज्य साने गुरूजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यांशी संबंधित असावा. या तीन फेलोशिपसाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे एकुण सहा विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रूपये फेलोशिप दिली जाणार आहे. या फेलोशिपच्या नियमावलीला विद्या परिषदेने मान्यता दिली.
बी. एङ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अडीच तासांऐवजी तीन तास वेळ वाढवून देण्यास विद्या परिषदेने मान्यता दिली. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात वर्णनात्मक लेखन जास्त करावे लागत असल्यामुळे तीन तासांचा वेळ परीक्षेसाठी द्यावा अशी मागणी केली होती. या बाबत अभ्यास मंडळाने विद्या परिषदेकडे शिफारस केली होती.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने या बैठकीत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांना या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या धोरणानुसार तयार करण्यात आलेले कॉमन क्रेडीटच्या वितरण सौरचनेला मान्यता देण्यात आली. शैक्षणिक धोरणाबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या सुधारित शिफारसींनाही सहमती देण्यात आली. श्रेणी/गुणवत्ता सुधार योजना नियमावलीत सुधारणा करण्यासाठी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारसींना विद्या परिषदेने मान्यता दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी प्रदान करण्यासंदर्भात नवीन नियमावली लागू केली असून त्यावर या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीत बोलतांना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी आत्मपरिक्षण करण्याची ही वेळ आहे. अभ्यासक्रम चांगले निर्माण केले व नियमित तासिका झाल्या तर विद्यार्थ्यांचा वर्गात येण्याचा ओढा वाढेल. प्रत्येक महाविद्यालयात ४१५ (१) नुसार पदे भरण्याबाबत आग्रह विद्यापीठाकडून धरला जाईल त्यासाठी काही महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. मात्र पद भरणे आवश्यक आहे असे कुलगुरू म्हणाले. या पदभरतीच्या संदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेंद्र रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्राचार्य अरविंद चौधरी, डॉ. दिपीका चौधरी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. राजपूत, डॉ. एस. टी. खैरनार, डॉ. साहेबराव भुकन, डॉ. अनिल डोंगरे यांचा समावेश करण्यात आला. विद्या परिषदेच्या या बैठकीत विविध विषयांवर सर्व सदस्यांनी अभ्यासपूर्ण चर्चा केली. शेवटी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.