संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे महाकवी कालिदास संस्कृत-व्रती राष्ट्रीय पुरस्कारासाठी आवेदन/नामनिर्देशन करण्याचे आवाहन

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे दरवर्षी पं रामनारायण शर्मा वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने “महाकवी कालिदास संस्कृत-व्रती राष्ट्रीय पुरस्कार” एक ज्येष्ठ आणि एक युवा विद्वान् यांना प्रदान केला जातो. ज्या विद्वज्जनांनी संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसार, विकास तसेच संशोधनासाठी आयुष्यभर सेवा केली त्यांचा यथोचित गौरव व्हावा हा प्रस्तुत पुरस्कार प्रदान करण्यामागचा उद्देश आहे. समाजात संस्कृत भाषेला गौरवयुक्त स्थान मिळवून देण्यात ज्यांनी अमूल्य योगदान प्रदान केले अशा महान विभूतीला महाकवी कालिदास संस्कृतव्रती राष्ट्रीय पुरस्कार विश्वविद्यालयाकडून दिला जातो.

या पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ विद्वानाला रोख पुरस्कार रू पन्नास हजार फक्त आणि युवा विद्वानाला रोख पुरस्कार रू पंचवीस हजार फक्त व गौरवपत्र असे आहे. पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे. यापूर्वी हा पुरस्कार महामहोपाध्याय प‌द्मश्री सत्यव्रत शास्त्री, महाकवी श्री गं बा पळसुले, महामहोपाध्याय श्रीपुलेल्ल श्रीरामचंद्रुडु, महामहोपाध्याय प्रा रमारंजन मुखर्जी, प्रा राधावल्लभ त्रिपाठी, डॉ का इ देवनाथन्, डॉ मिथिलाप्रसाद त्रिपाठी, म म भगीरथ प्रसाद त्रिपाठी, पं वसंत गाडगीळ, डॉ लीना रस्तोगी, प्रो वसंतकुमार भट्ट, प्रो शतावधानी गणेश, प्रो देवीसहाय पांडे, प्रो के रामानुजाचार्य, डॉ मणि द्रविड, प्रो एस् आर् लीला, प्रो रामकृष्णामाचार्यालु, प्रो पी सी मुरलीमाधवन्, प्रो अरिंदम चक्रवर्ती, प्रो रामसुब्रमण्यन्, प्रो बलराम शुक्ल, प्रो वेंकटेश पै यांना प्रदान करण्यात आला आहे.

Advertisement

या सर्व विद्वज्जनांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृत भाषेची अविरत सेवा केली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे महद्भाग्य विश्वविद्यालयाला प्राप्त झाले आहे. यंदाही 2024 या वर्षाकरिता कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे प्रस्तुत पुरस्कारासाठी आवेदन/नामनिर्देशन मागविण्यात येत आहेत.

ज्यांनी संस्कृतक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, इतर भाषांमधून संस्कृत भाषेत भाषांतर केले आहे किंवा संस्कृत साहित्यावर आधारित संशोधन केले आहे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांच्या कार्याला किंवा संशोधनाला मान्यता मिळाली आहे अशा वय 55 वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या विद्वानांकडून ज्येष्ठ विद्वानांकडून आणि वय 40 ते 55 वर्षे दरम्यान असलेल्या युवा विद्वानांकडून त्यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याच्या साधार दस्तावेजांसह चार प्रतींमध्ये तसेच registrar@kksu.org/pro@kksu.org या मेल आयडीवर सॉफ्ट कॉपीसह 10 जून 2024 पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डेय यांनी केले आहे. तसेच संस्कृतक्षेत्रातील विद्वद्वरेण्य व्यक्तीच्या नावाची शिफारस अथवा नामनिर्देशन संस्थाप्रमुख किंवा संस्कृतक्षेत्रातील सन्मान्य व्यक्ती किंवा संस्था करू शकतात.

ज्या आवेदकांनी प्रस्तुत पुरस्कारासाठी गतवर्षी प्रस्ताव पाठवले असतील त्यांनी नव्याने प्रस्ताव न पाठवता केवळ नव्याने प्रकाशित साहित्य अथवा उपलब्धींचे निर्देश करणारे पत्र पाठवावे.

आवेदन पाठविण्यासाठी पत्ता :

प्रो कृष्णकुमार पाण्डेय, कुलसचिव

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय,

प्रशासकीय भवन, मौदा रोड,

रामटेक – 441106, जि नागपूर

दू क्र – 07114-255549

इ-मेल – registrar@kksu.org/pro@kksu.org

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page