नवे पदवी अभ्यासक्रम – आधी सांगोपांग विचार, मग अंमलबजावणी व्हावी : डॉ विजय पांढरीपांडे
आजकाल अनेक विद्यापीठांमध्ये “अप्प्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम” सुरू झाला आहे. या उपक्रमाचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करून व्यावहारिक आणि उपयोजित अनुभवही मिळावा. शासन आणि शिक्षण विभागाने कौशल्य विकासावर भर दिला आहे ही स्वागतार्ह आणि स्तुत्य बाब आहे.
यापूर्वी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रॅक्टिकल प्रोजेक्टसाठी एक सत्र राखले जायचे. पण प्रवेशसंख्या झपाट्याने वाढल्याने विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे व्यवस्थापन हे कॉलेजसाठी डोकेदुखी ठरले आहे. प्राध्यापकांमध्येही याबाबत उत्साह कमी असतो. परिणामी अनेक वेळा विद्यार्थ्यांकडून फक्त “कट-पेस्ट” प्रकल्प सादर केला जातो आणि शिक्षकही तपासणी न करता फॉर्मल सही करून पुढे जातात. तोंडी परीक्षा म्हणजे निव्वळ औपचारिकता उरते आणि गुणांची उधळण होते — “तू मला खाजव, मी तुला खाजव” या तत्वावर.

आता नव्या अभ्यासक्रमांतून असे ठरवले आहे की चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात तीन सत्र विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योगात काम करून अनुभव घ्यायचा. ऐकायला आणि वाचायला छान वाटते, पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का, हे विचारात घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना या कालावधीत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, ही कल्पना देखील आदर्श आहे. पण उद्योग संस्था, कंपन्या — ज्या आधीच टार्गेट्स, डेडलाईन्स, फायर फायटिंग यामुळे त्रस्त आहेत — त्या या उपक्रमात का सहभागी होतील? केवळ समाजिक जबाबदारी म्हणून? की आणखी काही मोबदल्याशिवाय? विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, देखरेख, त्यांना काम शिकवणे यासाठी त्यांचे मनुष्यबळ का गुंतवतील?
याव्यतिरिक्त बरेचसे विद्यार्थीही गंभीर नसतात. त्यांच्यासाठी हा ट्रेनिंगचा काळ केवळ टाइमपास असतो. “कशीबशी पदवी मिळवायची” हेच उद्दिष्ट असते. अशा वातावरणात, हे नवे प्रयोग कितपत यशस्वी होतील, यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे.
या उपक्रमासाठी आवश्यक असते ते स्थानिक उद्योगांचे जाळे. जिथे कॉलेज आहे, त्या परिसरात जर योग्य कंपन्या नसतील, तर विद्यार्थी कुठे जातील? कुठे राहतील? त्यांच्या संख्येच्या मानाने कॉलेज किंवा विद्यापीठाकडे योग्य व्यवस्थापन यंत्रणा आहे का?
आकर्षक नावं, आधुनिक अभ्यासक्रम याच्या आडून पालकांचीही फसवणूक होताना दिसते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग अशा नावांनी गेल्या काही वर्षांत अनेक अभ्यासक्रम सुरू झाले. पण यामागे अभ्यासक्रमाची गुणवत्ता, शैक्षणिक गाभा, शिक्षणाचा हेतू याचा विचार झाला का? ‘बी.ई.’ आणि ‘बी.टेक.’ यामधला फरक, “कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग” या नावाखाली नेमकं काय शिकवलं जातं — याबाबत विचार करणं फार कमी लोक करतात. हे आपल्या समाजातील “सुशिक्षित अज्ञान” दर्शवतं.
नवे उपक्रम सुरू करताना फक्त नावीन्याची आणि आकर्षकतेची धुंदी नको. त्याआधी त्या उपक्रमाची गरज, अंमलबजावणीतील अडचणी, आवश्यक मनुष्यबळ, उद्योगांचे सहकार्य याचा सखोल आणि सांगोपांग विचार व्हायला हवा. सरकारच्या पातळीवरही “आम्ही काही तरी नवीन करतोय” हे दाखवण्याच्या घाईत, काही वेळा मूलभूत प्रश्न दुर्लक्षित होतात.
या लेखाचा उद्देश नवे अभ्यासक्रम विरोधात बोलणे नसून, कोणताही निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंनी परिपक्व विचार व्हावा, त्यावर स्पष्ट योजना आखून मगच अंमलबजावणी व्हावी, हाच आहे.
माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे
📞 7659084555
– शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू समीक्षक,
