नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आदर्श पिढी घडणार – माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे
डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त वाचक पुरस्कारांचे वितरण
सोलापूर : भारत हा ज्ञानपरंपरेने समृद्ध देश आहे. येथे शिक्षण, विज्ञान, धर्म या सर्व गोष्टी एकमेकांच्या अतिशय जवळच्या आहेत. याच गोष्टींचा सर्व विचार व अभ्यास करून तीस वर्षानंतर आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारतीय शिक्षण पद्धतीचा शोध घेण्याबरोबरच आदर्श पिढी निश्चित घडणार असल्याचे स्पष्ट मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र यांच्या तर्फे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्कृष्ट वाचक पुरस्कार वितरण व विशेष व्याख्यानात डॉ. साळुंखे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, सौ. साळुंखे यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी केले. मान्यवरांचा परिचय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी करून दिला. यावेळी श्रद्धा कोळी, सुहास जाधवर या विद्यार्थ्यांना व डॉ. दत्ता घोलप, शिक्षक आणि हनुमंत नागरगोजे, कर्मचारी यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. साळुंखे यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांनी ग्रामीण भागात वंचितांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवल्याचे सांगितले. जागतिकीकरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील झालेले बदल या विषयावर बोलताना त्यांनी नवीन तंत्रज्ञान, ऑनलाइन शिक्षण, ज्ञानसंपदा, औद्योगिक व्यूहरचना, चिरंतर विकास या विषयावर शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. पाटील, सहसचिव देबडवार, खजिनदार बापूसाहेब शितोळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समाधान पवार, डॉ. शशिकांत गायकवाड, प्रा. देवानंद चिलवंत, प्राचार्य डॉ. शेख, प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे आदी उपस्थित होते.
चांगल्या शिक्षणामुळे भारत महासत्ता बनणार – कुलगुरू
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी खडतर परिस्थितीतून वाट काढत खेड्यातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणा सर्वांना काम करावयाचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला रोल मॉडेल बनवण्याचे काम आपणास करावयाचे आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. भारताकडे मोठी युवाशक्ती आहे. या युवाशक्तीला चांगले शिक्षण देऊन भारताला महासत्ता बनवण्याचे काम सर्वांना करावयाचे असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले.