‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जून-२०२४ पासून राबविण्यात येणार
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी) राबविण्यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संलग्नित महाविद्यालयातील संस्थाचालक, अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांच्या कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जून-२०२४ पासून राबविण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी केली.
यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ डी एन मोरे, डॉ सूर्यकांत जोगदंड, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ पराग खडके, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संबंधि सूचना व मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते व संस्थाचालक तथा माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे, गोविंद घार, प्राचार्य डॉ मोहन खताळ व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ चासकर म्हणाले की, विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित महाविद्यालयातील बीए, बीकॉम व बीएस्सी पदवीच्या प्रथम वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम लागू करण्यात येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कौशल्याधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विविध विषय निवडता येणार आहेत. पदवीच्या प्रत्येक वर्षाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून बाहेर पडता येईल व पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण करताना वेगवेगळ्या विषयांसाठी प्राप्त केलेले गुणांकन अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट या राष्ट्रीय डिपॉझिटरी मध्ये जमा करता येणार आहेत व त्यांच्या उपयोग त्यांना भविष्यात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तथा रोजगार मिळवण्यासाठी करता येणार आहे. नियमित अभ्यासक्रमाच्या विषयांसोबत इतर विद्याशाखेचे विषय देखील घेता येणार आहेत. म्हणजेच बहुविद्याशाखीय पदवी प्राप्त करता येणार आहे. तसेच भारतीयज्ञान विषय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व, कौशल्य व व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध विषय उपलब्ध राहणार आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासणे, पर्यावरणीय जागरूकता निर्माण होणे व भारतीय संविधानाचे ज्ञानदेखील सर्व विद्यार्थ्यांना दिले जाणार असून त्याद्वारे सुजाण भारतीय नागरिक निर्माण करण्याची क्षमता या अभ्यासक्रमात आहे. विद्यार्थ्यांना अनुभवा आधारित ज्ञान प्राप्तिसाठी फिल्ड वर्क, केस स्टडी, प्रकल्प अभ्यास, औद्योगिक प्रशिक्षण, आंतरवासिता, एनसीसी, एनएसएस, क्रीडा व शारीरिक शिक्षण, योगा, सांस्कृतिक उपक्रम इत्यादींचा यामध्ये अंतर्भाव करण्यात आला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना पारंपारिक नोकऱ्यांच्या शोधात न राहता स्वयं अर्थ, उद्योजक निर्मितीकडे वळण्यास समर्थ होणार आहेत. ३ किंवा ४ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम २ किंवा १ वर्षाचा आहे. विद्यार्थी व पालकांना याबाबत प्राचार्यांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहनही कुलगुरूंनी केले.
कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अयोजनामागील भूमिका व पार्श्वभूमी विषद केली. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ डी एन मोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संस्थाचालकांच्या सहकाऱ्यांनी प्राचार्यांना येणाऱ्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन केले. तसेच अधिष्ठाता डॉ एम के पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या शैक्षणिक आराखड्याबाबत सुलभ मांडणी केली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शैक्षणिक अभ्यास मंडळाच्या सहा कुलसचिव डॉ सरिता यन्नावार (लोसरवार), अधीक्षक तुकाराम भुरके आदींनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयाचे संस्थाचालक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.