मिल्लीया महाविद्यालयात एनईपी-2020 कार्यशाळा संपन्न
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही एक शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी चांगली संधी -प्राचार्य डॉ. मझहर फारूकी
बीड: येथील मिल्लीया कला,विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात आयक्यूएसी व एनईपी सेल यांच्या संयुक्त वतीने दिनांक 27 जुलै 2023 गुरूवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी -2020 (Implementation of National Education Policy – 2020) या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग स्थायी समितीचे सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद च्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता तथा मौलाना आझाद महाविद्यालया औरंगाबाद चे प्राचार्य डॉ. मझहर फारूकी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजील, उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ, कार्यशाळेचे आयोजन सचिव पदयुत्तर संचालक तथा एनईपी सेलचे अध्यक्ष प्रा.फरीद अहमद नहरी, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस., नॅकचे समन्वयक डॉ.अब्दुल अनिस यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनईपी सेलचे अध्यक्ष प्रा.फरीद अहमद नहरी यांनी केले. त्यांनी सांगितले की भारताच्या स्वातंत्र्यानंतर नागरिकांच्या निरक्षरतेची समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारने विविध कार्यक्रम आखले, भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी देशभरासाठी समान शैक्षणिक पद्धत आणून विविध शिक्षण आयोग प्रस्तावित केले. प्रमुख अतिथी मौलाना आझाद महाविद्यालया, औरंगाबादचे प्राचार्य डॉ. मझहर फारूकी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 चा मुख्य उद्देश भारताला जागतिक स्तरावर ज्ञानाच्या बाबतीत सुपर पॉवर बनवणे हा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही एक शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी चांगली संधी आहे तसेच या अन्वये शैक्षणिक ढाच्यामध्ये, नियमामध्ये, प्रशासकीय व्यवस्था मध्ये अनेक सुधारणा व अमुलाग्र बदल नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे शाश्वत विकास ध्येय प्राप्त करणे शक्य होईल अशी समर्थ, सशक्त शैक्षणिक व्यवस्था उभारणे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, संभाषण कला, सहकार्य तसेच आत्मविश्वास या कौशल्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल सर्वांना माहीत होणे व प्रत्येकांचा सहभाग आवश्यक आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणाचा उपयोग समाज प्रगतीसाठी होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मध्ये शैक्षणिक व्यवस्था व संस्था यांच्याकरता मूलभूत तत्वे निश्चित करण्यात आली असून, भारतीय मूल्ये जोपासून अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्य, संविधानिक मूल्य तयार करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना योग्य शिक्षण दिले तरच ते चांगले नागरिक घडतील व समाज निर्मितीसाठी सहभागी होतील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोहम्मद असीफ इकबाल त्यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस.यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.