महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ”यांत्रिक बुद्धिमत्ता वापर आणि आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न
यांत्रिक बुद्धिमत्ता मानवतेच्या हितासाठी असावी – प्रा कुमुद शर्मा
वर्धा : यांत्रिक बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या हितासाठीच केला गेला पाहिजे असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो कुमुद शर्मा यांनी केले. आपण सजग व जागरूक राहून या तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा आणि याला संधी म्हणून पाहणं आवश्यक आहे. प्रो शर्मा डॉ आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा जनसंपर्क कार्यालय, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) आणि पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय), वर्धा चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यांत्रिक बुद्धिमत्ता : उपयोग व आव्हाने’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मास्वेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अंबादास मोहिते होते. सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुबेदार रामजी आंबेडकर शिक्षण समितीच्या संचालक डॉ चेतना सवाई व डॉ आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ मिलिंद सवाई व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रो कुमुद शर्मा म्हणाल्या की, भारत सरकारने यांत्रिक बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नेतृत्व करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षण क्षेत्रात त्याचा कसा वापर करता येईल, यावर चर्चा सुरू आहे. भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. नव्या प्रणाली आल्यावर चिंता होणे स्वाभाविक आहे, मात्र मानवी नैतिकतेची जपणूक करत आपण यंत्रबुद्धिमत्तेला स्वीकारलेच पाहिजे. अन्यथा आपण या प्रवाहात मागे पडू. यंत्रांवर अवलंबून राहिल्याने वेळ वाचतो आणि हा वेळ समाज व देशसेवेसाठी वापरणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.
उद्घाटन भाषणात डॉ चेतना सवाई म्हणाल्या की, यांत्रिक बुद्धिमत्ता आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी उपयोगी ठरली पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञानात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता वाढेल. अध्यक्षीय भाषणात डॉ अंबादास मोहिते म्हणाले की, यांत्रिक बुद्धिमत्तेचा सर्वच क्षेत्रांमध्ये वापर होत आहे. आपण यामध्ये कौशल्य व प्रावीण्य मिळवले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाची दरी कमी करण्याची आवश्यकता आहे अशी सूचनाही त्यांनी केली. प्राचार्य डॉ मिलिंद सवाई यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. डॉ विलास वाणी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.
उद्घाटनानंतर ‘माध्यम व जनसंपर्क क्षेत्रातील एआयचा उपयोग’ या विषयावर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी एस मिरगे यांनी विचार मांडले. ‘शिक्षण क्षेत्रातील एआयचा उपयोग’ या विषयावर हिंदी विद्यापीठाच्या ‘लेबोरेटरी इन इन्फॉर्मेटिक्स फॉर द लिबरल आर्ट्स (लीला)’चे प्रभारी डॉ अंजनी कुमार राय आणि जनसंचार विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेश लेहकपुरे यांनी आपले मत व्यक्त केले. ‘सायबर सुरक्षा आणि ए आय’ या विषयावर हिंदी विद्यापीठाचे मुख्य सूचना सुरक्षा अधिकारी डॉ गिरीश पांडे आणि सॉफ्टवेअर असोसिएट डॉ हेमलता गोडबोले यांनी विचार मांडले.
समारोप समारंभादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी हिंदी विद्यापीठाचे हिंदी अधिकारी राजेश यादव, आयोजन समितीचे डॉ विलास वाणी, प्रा परमानंद उके, प्रा आशीष कातोरे, डॉ गणेश गाडेकर, समितीचे सदस्य डॉ एस डी भोईकर, डॉ माधुरी झाडे, डॉ एम एन कुबडे, डॉ व्ही विटनकर, डॉ डी एस मगरदे, प्रा बी एन खेडकर, प्रशांत घुलक्षे, स्वप्नील चव्हाण, डी पी ताकसांडेक, वृषाली यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
