शरद पवार दंत महाविद्यालयात पाचवी राष्ट्रीय सिम्बायोटिक आंतरविद्याशाखीय परिषद यशस्वी
वर्धा : दंतवैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांमधील व्यावसायिक आणि पदव्युत्तर विद्यार्थी यात सांघिक कार्याची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने सावंगी (मेघे) येथील शरद पवार दंत महाविद्यालयाद्वारे पाचव्या राष्ट्रीय सिम्बायोटिक आंतरविद्याशाखीय परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. आभासी माध्यमाद्वारे आयोजित या परिषदेत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आदी विविध राज्यांतील २३ चमू सहभागी झाल्या होत्या.
प्रारंभी या परिषदेत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरवकुमार मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर तसेच विद्यापीठाचे प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले यांनी सदिच्छा दिल्या. या अतिथी वक्त्यांनी मार्गदर्शन करताना आंतरव्यावसायिक आणि आंतरविद्याशाखीय व्यवस्थापनावर भर देत व्यापक व सर्वसमावेशक रुग्णसेवेचे आवाहन सहभागी विद्यार्थ्यांना केले. परिषदेत संयुक्त अमेरिकेतील चार तर जर्मनी येथील एका वक्त्याने सहभागी होत आंतरविद्याशाखीय विषयांची वर्तमान व व्यापक श्रेणीबाबत मांडणी करीत या राष्ट्रीय परिषदेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. या परिषदेनिमित्त आयोजित सादरीकरण स्पर्धेत उत्कृष्ट केस प्रेझेंटेशन करणाऱ्या सिंहगड दंत महाविद्यालय व रुग्णालय (पुणे), ग्रामीण दंत महाविद्यालय (लोणी), सवेथा दंत महाविद्यालय व रुग्णालय (चेन्नई) शरद पवार दंत महाविद्यालय (सावंगी) आणि डेंटल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (राजनांदगाव, छत्तीसगड) या महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. अचिंत चाचडा, डॉ. अपर्णा शर्मा व डॉ. तुलसी लोधी यांनी केले.
परिषदेच्या प्रारंभी आयोजन समिती अध्यक्ष डॉ. सुवर्णा डांगोरे यांनी स्वागतपर भाषण केले. तर आभार सचिव डॉ. प्रियांका निरंजने यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे, अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ. अलका हांडे, डॉ. जोयिता महापात्रा, डॉ. राणू ओझा आणि डॉ. नेहा पंके यांनी परिश्रम घेतले.