उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा
जळगाव : कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित शास्त्र प्रशाळेत सांख्यिकी विभागाच्या वतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विभाग प्रमुख प्रा आर एल शिंदे यांचे मुख्य व्याख्यान झाले.
सुप्रसिध्द सांख्यिकी तज्ज्ञ प्रा प्रशांतचंद्र महालनोबिस यांची जयंती राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरी केली जाते. यावर्षी “निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर” अशी या दिनाची थिम होती. प्रा आर एल शिंदे यांनी राष्ट्रनिर्माणात सांख्यिकीच्या सामाजिक-आर्थिक नियोजनाच्या अंगाने महत्व सांगितले. प्रा मनोज पाटील यांनी भारतीय संख्या शास्त्रज्ञ याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्रात त्यांचे प्रकल्प, नोकरी-प्रशिक्षण अनुभव आदिंचे विविध पैलू सांगितले. ऑनलाईन सांख्यिकी प्रश्नमंजुषा यावेळी घेण्यात आली.
प्रशाळेचे संचालक प्रा एस आर चौधरी, गणित विभाग प्रमुख प्रा के एफ पवार, प्रा एच एल तीडके, यावेळी उपस्थित होते. प्रा मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ रोहन कोष्टी यांनी आभार मानले.