सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन
नवकल्पना व उद्योगास मिळणार एक लाख ते 10 कोटी निधी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इनक्यूबेशन सेंटर यांच्यातर्फे राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नवकल्पना व उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख ते दहा कोटी रुपये पर्यंत निधी मिळणार आहे.
या राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा लक्ष्मीकांत दामा, दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा, इनक्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक डॉ विकास पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठता डॉ शिवाजी शिंदे, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही पी उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्यम इनक्युबेशनसेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेश गुरानी यांनी प्रास्ताविक केले.
या स्पर्धेचे आयोजन सविष्कार इंडिया, स्वावलंबी भारत अभियान, आय हब गुजरात, आयएसबीए आणि एमएसआयएनएस यांच्या सहकार्याने केले जात आहे. ही स्पर्धा तीन टप्यांत पार पडेल. पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामधील नवउद्योजकांकडून त्यांच्या कल्पना व उद्योगाविषयी सविस्तर माहिती मागून घेण्यात येईल. त्यासाठी दि २६ जुलै ते ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राप्त अर्जांची व कल्पनांची छाननी होईल. दि १२ते १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत त्याचे मूल्यमापन होईल. यावेळी संबंधित नवोद्योजकांना ऑनलाईन माध्यमातून गठीत समिती संवाद साधेल व माहिती जाणून घेईल. त्यानंतर अंतिम स्पर्धा २३ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी http://incubation.sus.ac.in/ या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तसेच ७८९२९१७३५४ या भ्रमणध्वनी वर संपर्क करता येईल.