शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागामध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा
कोल्हापूर : इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल १४ दिवस चांद्रयान ३ हे चंद्रावर संशोधन करत होतं. 23 ऑगस्ट 2024 रोजी या उल्लेखनीय कामगिरीचा पहिला वर्धापन दिन होता. या निमित्याने शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागामध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला गेला. सकाळी ९ वाजून ३० मी भारत मंडपम-इस्रो यांच्या कडून प्रसारित झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण सभागृहामध्ये करण्यात आले.
कोल्हापूरचे शास्त्रज्ञ अमेय भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी इस्रो द्वारा निर्मित विविध उपग्रहामधील स्पेसक्राफ्ट पॉवर सिस्टम, सौरघट सौरघट ॲरे, विविध ग्राउंड टेस्ट इत्यादी विषयी माहिती दिली. त्यांनी इस्रो मध्ये असताना वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेमध्ये निभावल्या कार्याची सुद्धा या व्याख्यानात माहिती करून दिली. अवकाशामधील वाढत चाललेल्या कचऱ्या विषयी चिंता व्यक्त करून जुन्या उपग्रहांच्या बाबतीत काय घडू शकते ते सांगितले. जवळच्या उपग्रहांसाठी, अभियंते त्याचा शेवटचा इंधन वापरून त्याचा वेग कमी करतील त्यामुळे ते कक्षेबाहेर पडेल आणि वातावरणात जळून जाईल किंवा उपग्रह पृथ्वीपासून खूप दूर पाठवले जातात अशी माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पदार्थविज्ञान विभाग प्रमुख प्रा राजेंद्र सोनकवडे हे होते. विकसित केल्या जाणाऱ्या अवकाश तंत्रज्ञाचा मानवास खूप लाभ होत असून त्याची प्रगती वेगाने होत आहे असे सांगितले. परंतु त्याच बरोबर आपण सर्वानी मानवीय मूल्यांना जपले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ राजीव व्हटकर यांनी केली. त्यांनी चांद्रयान मोहिमेचा थोडक्यात इतिहास सांगून चांद्रयान मोहिमेची उद्दिष्टे स्पष्ट केली. सदरच्या कार्यक्रम मध्ये पदार्थविज्ञान विभागातील प्रा के वाय राजपुरे, डॉ ए व्ही मोहोळकर, डॉ एन एल तरवाळ, डॉ एम व्ही टाकळे, डॉ व्ही एस कुंभार, डॉ एस एस पाटील, डॉ एम आर वाईकर आणि डॉ ए आर पाटील, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना परीट आणि साक्षी काळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ एस पी दास यांनी आभार मानले.