गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय अंतराळ दिवस उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून मिळाली अंतराळाची सखोल माहिती
गडचिरोली : भारत हा 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरणारा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय अंतराळ दिवस” म्हणून घोषित केला आहे. 23 ऑगस्ट 2024 रोजी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करीत आहे. राष्ट्रीय अंतराळ दिन चंद्रावर चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्याअनुषंगाने, पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागातर्फे गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी स्काय वॉच ग्रुप व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष डॉ सुरेश चोपणे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखण, न न व सा चे संचालक डॉ मनीष उत्तरवार, भौतिकशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ सुनील बागडे, व भौतिकशास्त्र विभागाचे डॉ अपर्णा भाके, डॉ प्रितेश जाधव, डॉ नंदकिशोर मेश्राम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी, मार्गदर्शन करतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे म्हणाले, प्रगत तंत्रज्ञानामुळे आज जमिनीपासून अवकाशापर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. स्पेस सायन्समध्ये रुची असणारा विद्यार्थी यामध्ये करीअर करु शकतो. भविष्यामध्ये मागास भागातील विद्यार्थ्यांचा स्पेस सायन्समध्ये सहभाग वाढावा, अशी अपेक्षा कुलगुरु डॉ बोकारे यांनी व्यक्त केली.
स्काय वॉच ग्रुप व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष डॉ सुरेश चोपणे यांनी इस्रोच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्रयान मोहिमेबद्दल उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनातून इत्यंभुत माहिती दिली. कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांनी भारत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करीत असल्याबाबत शुभेच्छा दिल्या.
न न व सा चे संचालक डॉ मनीष उत्तरवार यांनी स्पेस दिनाचे महत्व समजावून सांगितले तसेच विद्यार्थ्यांना स्पेस विज्ञानामध्ये संशोधन करण्यासाठी मार्गदर्शनातून प्रवृत्त केले.
राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या औचित्याने पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन भौतिकशास्त्र विभागाचे प्रा विकास पुनसे यांनी केले.