आंतरराष्ट्रीय महिला दिनी ताराबाई स्त्री अभ्यास केंद्रात अहिल्याबाई होळकरांवर राष्ट्रीय चर्चासत्र
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अंतर्गत, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र द्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिन व अहिल्याबाई होळकर त्रिशतकोत्तर जयंती वर्षाच्या निमित्ताने ” राणी अहिल्याबाई होळकर : विचार आणि कर्तृत्व ” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलें. या कार्यक्रमास बिजभाषक म्हणून वालचंद कला , वाणिज्य महाविद्यालय सोलापूर येथील प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण हे लाभले. तसेच अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर यांनी नमूद केले की सत्तेवर आल्यानंतर भल्याभल्या व्यक्तिनचे नीतिमत्ता बदलते मात्र सुमारे तीस वर्षाच्या राजकीय कारकिरदीत लोककल्याण हे ध्येय्य अहिल्याबाईनी कधीच दूर होवू दिले नाही. महिलांच्या सबलीकरणाच्या प्रक्रियेत पुरुषांचा सहभाग हा महत्वाचा आहे. एक माणूस म्हणूनही स्त्रियांचा सन्मान करत त्यांचे सहअस्तित्व व त्यांच्या गरजा आणि अपेक्षा मान्य करणे ही महत्वाचे आहे असे प्रतिपादन प्रा. अमृतकर यांनी केले.

यावेळी बोलताना प्रा. चव्हाण यांनी अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सर्वसामान्य रयतेसाठी केलेलें महत्वपूर्ण व अनन्यसाधारण असून त्यांनी केवळ आपल्याच संस्थांनापुरता विचार केलेला नाहीं तर भारतभर जागोजागी पानवठे बांधले. जनावरांसाठी पाण्याच्या विशेष सोयी केल्या. अनेक तलावांची निर्मिती केले. अनेक नांद्याना घाट बांधले. तसेच राज्य करताना शिस्त व नियम महत्वाचे असून त्याचे पालन करताना त्यांनी घरातील सदस्य असो अथवा संस्थांनातील त्यांनी शिस्त पालनाचे नियम सर्वांसाठी समान ठेवले. तसेच सर्व प्रजेसाठी समभाव दृष्टिकोन अहिल्याबाईंनी बाळगला. सैन्य मजबूत असेल तर राज्य सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून त्यांनी कवायती फौज फ्रेंच सैन्याच्या मदतीने तयार केली. तसेच अनेक प्रवाशांची घाट मार्गात होणारी लूट थांबवण्यासाठी त्यांनी तेथील लोकांसोबत हिंसेचा अवलंब न करता कर संकलन करण्याचे काम त्यांना सोपवले व कुणाचीही यापुढे घाट मार्गात लूट होऊ नये अशी सोय केली. त्यांनी अनेकदा शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला व जर शांततेने प्रश्न सुटत नसेल तरच अहिल्याबाईंनी शस्त्र हाती घेतले. त्यांनी कायमच आपल्याला संस्थानात हुंडा प्रथेला विरोध केला, विधवांना पतीच्या संपत्तीत अधिकार दिला, त्यांना मूल आपल्या मर्जीने दत्तक घेण्याचा अधिकार दिला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा एवढाच कर असेल अशी योजना केली. त्यांनी नद्यांवर पूल, जनावरांसाठी पाण्याची सुविधा, सर्पदंश किंवा इतर शारीरिक कारणांसाठी औषधोपचारांच्या सोयी साठी त्या काळात हकीम वैद्य यांची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी अन्नछत्र, थंडीत घोंगड्यांचे वाटप, उन्हाळ्यात पाण्याच्या सोयीसाठी पाणवठे, धर्मशाळा इ. अनेक समाज उपयोगी सर्वसामान्यांच्या उपयोगी पडणाऱ्या सेवा सुविधांची निर्मिती आपल्या संपूर्ण कार्यकाळात केली आणि सर्वात विशेष बाब म्हणजे यासाठी त्यांनी कुठल्याही स्वरूपाची कोणतीच रक्कम शासनाकडून त्या काळात घेतली नव्हती. अशी मांडणी डॉ. चव्हाण यांनी यावेळी बोलताना केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. निर्मला जाधव यांनी केले. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, अहिल्याबाई या समाजासाठी प्रेरणा आहे. कुटुंबात येणाऱ्या अनेक संकटाना व आव्हानांना त्यांनी सक्षमपणे तोंड दिले. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक आप्तेष्टांचे मृत्यू पाहिले. परंतू तरिही त्यांनी खंबीरपणे आयुष्यात उभ्या तर राहिल्याच शिवाय उत्कृषपणे आपले संस्थान सांभाळले. आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहोत परंतू हा दिन साजरा होण्यामागे अनेक स्त्रियांनी संघर्ष केलेला आहे. त्यामुळे या उत्सव आणि आनंदासोबत जबाबदारी आणि कर्तव्ये देखील अद्याहृत असतात याचीही जाणीव आपण ठेवायला हवी अशी मांडणी प्रस्ताविकात डॉ. जाधव यांनी केली.
चर्चासत्राच्या दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात सत्रात संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथील प्रा. भास्कर टेकाळे यांनी अहिल्याबाई होळकर: कुशल प्रशासक व राजकीय मुत्सद्देगिरी, द्वितीय सत्रात कला व वाणिज्य महाविद्यालय माढा जिल्हा सोलापूर येथील प्रा. संगीता पैकेकर यांनी साहित्यातील अहिल्याबाई, मॉडर्न महाविद्यालय पुणे येथील डॉ. गुंजन गरुड, यांनी अहिल्याबाइंचे आर्थिक धोरण, इतिहास विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील प्रा. संजय पाईकराव यांनी अहिल्याबाई यांचे तलाव, घाट,मंदिर पुनर्निर्माण व स्थापत्य कला विषयक दृष्टी आणि धोरण या विषयांवर शोध निबंध सादर केले व सत्रनिहाय अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. पुष्पा गायकवाड, प्रा. डॉ. बिना सेंगर यांनी मार्गदर्शन केले. तसेच चर्चासत्राच्या समारोप सत्रात हैद्राबाद येथील स्त्री अभ्यासाच्या अभ्यासक मा. ए. सुनिता यांनी इतिहास आणि स्त्रिया या अनुषंगाने मार्गदर्शन केले तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. व्यंकटेश लांब यांनीही मार्गदर्शन केले.
ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संशोधन सहायक डॉ. सविता बहिरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन साहायक प्रा. डॉ. अश्विनी मोरे यांनी केले. यावेळी प्रा. बी. एल. चव्हाण, डॉ. सोनाली मस्के,तसेच मोठ्या प्रमाणात कर्मचारी, महिला, संशोधक , तसेच केंद्रातील श्री. संतोष लोखंडे,संजय पोळ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.