उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे राष्ट्रीय चर्चासत्रा संपन्न
जळगाव : भारतीय लष्करी शक्तीचे झालेले पुनरुज्जीवन आणि क्रांतीकारी बदल ही छत्रपती शिवाजी महाराजांची देणं असल्याचे प्रतिपादन मेजर जनरल जी. डी. बक्षी (निवृत्त) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील राष्ट्रीय चर्चासत्रात व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी निती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता या विषयावरील आयोजित दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी मेजर जनरल बक्षी बोलत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी शक्तींचे वर्णन करत आधुनिक काळाशी त्यांची सांगड घातली. सोळाव्या शतकांपर्यंत या देशावर परकीय आक्रमणे होत होती. आपसातील हेवेदावे आणि फूट यामुळे परकीय आक्रमणे परतवता आली नाही. पराभवांचा सामना करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग यासारख्यांनी वेगळया पध्दतीने या आक्रमणांचा सामना करुन विजय प्राप्त करुन दिला.
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचा विस्तारही केला. चालत आलेला रुढीवाद त्यांनी युध्दाच्यावेळी बदलला. त्याचा परीणाम असा झाला की, भारतीय लष्करी शक्तीचे आता पुनरुज्जीवन झाले असून भारताचे लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे. इतर कोणताही देश आता भारताकडे वाकडया नजरेने बघू शकत नाही ही सर्व शिवाजी महाराजांची देणं आहे असे बक्षी म्हणाले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केला.
दुसऱ्या सत्रात हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटी नाशिकचे सदस्य प्रकाश पाठक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा युध्द पध्दतीवर प्रकाश टाकला. उच्चप्रतीचे ध्येय, प्रजेचा प्रांजळ सामुहिक एकत्रित पाठींबा, प्रजाहित दक्ष राजा, अत्यंत गतिमानता आणि रणनितीसाठी उत्कृष्ट भागाची निवड या पाच बिंदूंवर गनिमी कावा यशस्वी झाला असे मत प्रा. पाठक यांनी व्यक्त केले. प्रा.सर्जेराव भामरे यांनी या सत्राचा अध्यक्षीय समारोप केला.
तिसऱ्या सत्रात भारत सरकारच्या ऐतिहासिक संशोधन मंडळाचे सदस्य विक्रमसिंग बाजी मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज – दक्षिण दिग्विजय आणि त्याचे सामरिक महत्व यावर मांडणी केली. प्रा. सुरेखा पालवे या अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. अशोक राणा यांनी विदेशी व्यापार आणि स्वराज्याचे संरक्षण, शासनाच्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे सल्लागार सुधीर थोरात यांनी स्वराज्यातील प्रशासन आणि सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठीचे धडे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे डॉ. सचिन जोशी यांनी शिवकाळातील किल्ले तसेच रायगड विकास प्राधिकरणाचे वरुण भामरे यांनी किल्ल्यांचे लष्करी स्थापत्यशास्त्र या विषयावर मांडणी केली. विविध सत्रांचे सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम पाटील व प्रा. वीणा महाजन यांनी केले.