संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे समारोप
जमिनीतील चांगले जीवाणू संरक्षित ठेवून शेती करा – पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर
अमरावती : रासायनिक, सेंद्रिय शेती करण्याच्या पध्दतीवर बंदी आणून जीवान्मृतचा वापर करुन जमिनीतील चांगले जीवाणू संरक्षित ठेवून शेतक-यांनी शेती करावी, असे मत एस पी के अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी, अमरावतीचे पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले. ‘कृषी तंत्रज्ञानातील पध्दती’ या विषयावर व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ या थीमवर आधारित संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे आयोजन करण्यात आले, त्याचा समारोप दृकश्राव्य सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, आय.आय.एल. च्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अनिता पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे संपन्न झालेल्या आविष्कार स्पर्धेत तन्मय निमकर, आनंद सपकाळ व प्रतीक रघुवंशी या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. 74 गुणांसह बायोटेक्नॉल़ॉजी विभागातील संशोधन विद्यार्थ्यांनी यावर्षीचे फिरते चषक पटकाविले.
डॉ. पाळेकर विषयाची मांडणी करतांना म्हणाले, मी सांगितलेली कृषि तंत्रज्ञानावर आधारित शेती करा, कमी खर्चामध्ये शेती होईल, शेतक-यांचे उत्पन्न सुध्दा दुप्पट होईल. रासायनिक, सेंद्रिय व शेणखताची शेती ही विदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे आपल्या येथील शेतजमिनी प्रदुषित झाल्यात. नैसर्गिक संसाधने प्रदुषित केल्यामुळे ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर शेतक-यांनी केला पाहिजे, त्यासाठी घरीच जीवान्मृत तयार करुन शेतात शिंपल्यास चांगल्या सूक्ष्मजीवाचे संवर्धन होईल, त्यामुळे पीक भरपूर येईल.
रासायनिक शेतीमुळे विविध आजाराने माणसाला विळखा घातला आहे. कॅन्सर, मधुमेह, ह्मदयघात यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. मानवी जीवन निरोगी रहावे, त्यासाठी विषमुक्त शेती करण्याची आवश्यकता आहे, त्याचे महत्व नीती आयोगाला पटले असून त्यांनी माझे तंत्रज्ञान शेतीत वापरण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे तसेच विद्यापीठाने अभ्यासक्रमात या बाबींचा समावेश करावा, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी क्षमता वाढवाव्यात – कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते म्हणाले, विद्यार्थी दशेत आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात, बक्षिसही ते मिळवितात, पण आजचे जग स्पर्धेचे आहे. त्याला तोंड देण्यासाठी विद्याथ्र्यांनी आपल्यातील क्षमता वाढविल्या पाहिजे. विविध कौशल्य आत्मसात करुन परिपूर्ण व्यक्तिमत्व विकसित करावे. स्पर्धेत क्षमतांची जाणीव होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेवर भर दिलेला आहे. जग झपाट्याने बदलत आहे. बदलत जाणा-या आजच्या स्थितीत विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये बदल करावा, त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमात सर सी व्ही रमण व संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कुलगुरूंनी डॉ सुभाष पाळेकर यांचा सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. अनिता पाटील यांनी केले. संचालन डॉ. अभिजित इंगळे, तर आभार गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी केले. समारोप कार्यक्रमाला शैक्षणिक विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.