यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे व्याख्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विद्याशाखेच्या प्र. संचालक, डॉ. चेतना कामळस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. आपले विचार व्यक्त करतांना डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितले की, विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश लोकांपर्यंत विज्ञान नेणे हा आहे. विज्ञानाची सुरुवात कशी झाली त्याचा संपुर्ण इतिहासच आपल्या अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
विज्ञानामध्ये आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी जगासाठी दिलेले योगदान त्यांनी विषद केले. योग अभ्यासाचा पाया देखील वैज्ञानिक आहे आणि हि भारताची जगाला दिलेली मोठी देन आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्यामध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन असला पाहिजे, त्यामुळे आपल्या जिवनात अनेक चांगले बदल होत असतात. आत्मनिर्भर भारतामुळे आपण कमी खर्चात औषधे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, तसेच अंतराळ मोहिम यशस्वी करू शकलो. कोव्हीडमध्ये आपण स्वत: तयार केलेली लस हे मोठे उदाहरण आहे. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी चांगले शिक्षण, तंत्रज्ञानाबाबत ज्ञान, त्याचप्रमाणे लोकांना जागृत करणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे यामध्ये मोठे योगदान आहे, कारण तळागाळातील लोकांसाठी मुक्त विद्यापीठ काम करत आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
आपले विचार व्यक्त करतांना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, विज्ञान कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय स्विकारत नाही. दैनंदिन जिवन जगत असतांना आपल्या अवतीभवती असणाऱ्या घटनांचे निरीक्षण करणे गरजेचे असते. कारण त्यामागे विज्ञान असते आणि ते आपण समजून घेणे गरजेचे असते. आपल्या मनात निर्माण झालेले प्रश्न आपल्या शिक्षकांना, वरिष्ठांना आपल्या शंकांचे निरसरन होईपर्यंत आपण विचाराल, तेंव्हा खरा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारला असे म्हणता येईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता कापडे यांनी केले, तर आभार घनशाम पाटील यांनी मानले. प्रमुख पाहूण्यांची ओळख रुपाली टिक्कल यांनी करून दिली. कार्यक्रमास विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, केटीएचएम महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुक्त विद्यापीठातील महाराष्ट्र शासनाच्या प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे विद्यार्थी उपस्थित होते.