शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : २२ डिसेंबर, महान भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी शिवाजी विद्यापीठातील गणित अधिभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी दिनांक १८ डिसेंबर ते १७ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दिनांक १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत गणित सप्ताह आयोजित करण्यात आला. यामध्ये १८ डिसेंबर रोजी गणित अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी के. आर. मंगलम विद्यापीठ, गुरुग्रामचे कुलगुरू व प्रतिष्ठित गणिततज्ञ प्राध्यापक दिनेश सिंग यांचे श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील योगदानाबद्दल व्याख्यान प्रसारित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिनांक १९ डिसेंबर रोजी रामानुजन यांच्या जीवनावरील चित्रपटाचा आस्वाद घेतला. दिनांक २० डिसेंबर रोजी डॉ. एच. व्ही. कुंभोजकर यांनी ‘Is 2+2=4?’ या विषयाच्या अनुषंगाने गणिताचा विकास विषद केला.

Organized various programs on the occasion of National Mathematics Day in Shivaji University

दिनांक २१ डिसेंबर रोजी प्रा.व्ही. एम. सोलापूरकर Adjunct Professor, भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे यांचे प्राचीन भारतीय गणित या विषयांतर्गत ‘Keral School of Mathematics’ या विषयावर व्याख्यान झाले. दिनांक २२ डिसेंबर रोजी गणित अधिविभागातील विद्याथ्यांनी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला. या दिनाचे औचित्य साधून प्रा. डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, School of Mathematical Science, SRTM University, Nanded यांचे ‘Different Kinds of Proofs’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दिनांक २३ डिसेंबर रोजी शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला. दिनांक २४ डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धेच्या आयोजनाने गणित सप्ताहाची सांगता झाली.

Advertisement

राष्ट्रीय गणित दिनाच्या औचित्याने शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील व गणित अधिविभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, सेमिनार स्पर्धा आयोजित करण्यात येतील तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड उत्पन्न होवून वृद्धिंगत व्हावी यासाठी कोल्हापूर शहरातील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत तसेच गणिताची रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना किरण बर्वे, समन्वयक, गणित Olympiad, भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे यांचे ‘Mathematics Olympiad’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. विभागात आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धांमधील पहिल्या तीन विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ हे ज्येष्ठ गणिततज्ञ हरिश्चंद्र यांचे जन्मशताब्दी वर्ष यानिमित्ताने दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘Reprsentation Theory’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये प्रा. डॉ. एम. व्ही. टाकळे, Adjunct Professor, Dept. of Physics, SUK आणि प्रा. हेमंत भाटे, Adjunct Professor, Dept. of Mathematics, SPPU विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरील सर्व कार्यक्रम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग तसेच एन.सी.एस.टी.सी. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या आर्थिक सहाय्याने संपन्न होत आहे असे गणित अधिविभागप्रमुख प्रा.डॉ. सरिता ठकार यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page