एमजीएममध्ये राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुट कॅम्पचे उद्घाटन संपन्न

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय शिक्षण विभाग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीई बुट कॅम्प दुसऱ्या एडिशनमधील पहिल्या सत्राचे उद्घाटन एआयसीटीई’चे संचालक प्रा टी जी सीताराम यांच्या हस्ते दुरदृश्यप्रणालीमार्फत करण्यात आले. या बुट कॅम्पचे आयोजन करण्याची संधी महाराष्ट्र राज्यातून केवळ एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयास मिळाली आहे.

विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्यास प्रत्यक्षपणे मुख्य अतिथी म्हणून उद्योजक राम भोगले हे उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, संचालक डॉ.रणीत किशोर, केंद्रीय शिक्षण विभाग इंनोव्हेशन सेलचे सौरभ निर्मळे, उमेश राठोड, मॅजिकचे आशिष गर्दे, वाधवाणी फाउंडेशनचे विशाल नायर, एमसीईडी विभागीय अधिकारी दत्तात्रेय थावरे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.टी.जी.सीताराम म्हणाले, आपण या बूटकॅम्पमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे शिल्पकार आहात. आज आपल्याकडे ४० हजारांहून अधिक स्टार्टअप असून आपण जगात सर्वाधिक स्टार्टअप असणाऱ्या देशांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा देश आहोत. या ५ दिवसीय कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला कौशल्य, नाविन्यता, संपर्क, संधी आणि विशेषत: आपला सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आपणास इथे अनेक गोष्टी शिकता येतील. इथे आपणास जितके ज्यास्त शिकता येईल, तितके आपण शिकावे.

आपण जीवनात कोणीही असलो तरी आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञान, कौशल्य, अभियोग्यता आणि मूल्ये या घटकांवर आपल्याला काम करावे लागते. विशेषत: यामध्ये मूल्यांना अधिक महत्व असून मूल्यांशिवाय आपल्या प्रयत्नांना दिशा मिळत नाही. आज वयाच्या सत्तरीतही मी शिकत असून आपण कायम विद्यार्थी म्हणून शिकत राहणे गरजेचे आहे. समाजातील अडचणी समजून आपण त्या समस्या सोडविण्यासाठी स्टार्टअपचा विचार करायला पाहिजे. आपल्या कल्पना आणि आपल्याला काही निर्माण करायचे असेल तर ते क्षणिक असून नये. आपण निर्माण करीत असलेले स्टार्टअप हे शाश्वत असायला पाहिजे. विशेषत: आपण निर्माण करीत असलेल्या स्टार्टअपमधून समाजाच्या अडचणी सुटायला हव्यात असे उद्योजक राम भोगले यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले, तरूण हे देशासाठी खूप मोठी शक्ती असतात. आपण या पाच दिवसीय कॅम्पमध्ये आपले स्टार्टअप, आपल्या विविध कल्पना मांडत असताना उत्पादनशक्ती, कमी मूल्य, दर्जातील सुधारणा, पर्यावरणपुरकता या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आपण भाग्यशाली आहात की, आपल्याला सर्वोत्तम तंत्रज्ञान  उपलब्ध आहे. आपण वेळेसोबत न चालता वेळेच्या पुढे चालत राहिलात तर समकालीन काळाचे नेतृत्व करू शकाल, असे मला विश्वास वाटतो. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा योग्यप्रकारे वापर करता यायला हवा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची एमजीएम विद्यापीठ पूर्णपणे अंमलबजावणी करीत असून आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहोत. आपण या ५ दिवसांत अत्यंत सकारात्मकपणे नावीन्यपूर्ण बाबी शिकत स्वत:च्या कल्पना मांडू शकाल.

आयडीई बुट कॅम्पविषयी माहिती :

आयडीई बुट कॅम्प दुसऱ्या एडिशनमधील पहिल्या सत्रामध्ये देशभरातील ३००० विद्यार्थी सहभागी होणार असून एमजीएममध्ये होणाऱ्या कॅम्पसाठी देशभरातील ३०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हा कॅम्प सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२४ ते शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२४ असे ५ दिवस चालणार आहे. या ५ दिवसीय कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यता, कौशल्य, उद्योजकता, डिझाईन, प्रशिक्षण अशा विविध बाबी तज्ञ मार्गदर्शकांकडून शिकता येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन :

                एमजीएम विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या ५ दिवसीय कॅम्पमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मार्गदर्शक, स्टार्टअपचे संस्थापक, उद्योजक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वाधवानी फाऊंडेशन तज्ञांच्या नेतृत्वाखालील उद्योजकता शिक्षण आणि उत्कृष्ट प्रशिक्षण मॉड्यूलचे यावेळी सादरीकरण करणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी केले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भक्ती बनवस्कर व प्रा. सायली काळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page