एमजीएम विद्यापीठात राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध उत्पादनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अधिकारी संजय कोतूरकर, सेंट्रल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ व्ही एल धारूरकर, संचालक डॉ संपतकुमार, खादी विभागाच्या संचालिका शुभा महाजन, प्राध्यापक व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, डिझाईन स्कूल हा एमजीएमचा आत्मा आहे. आपल्या सर्वांना खूप काम करायचे असून विद्यार्थ्यांनी सृजनशीलता जपली पाहिजे. नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन आपण आपले स्वत:चे उत्पादने तयार केली पाहिजेत.

Advertisement

पैठणी हे मिथक नसून वास्तव आहे. पैठणीची रोममध्ये प्रचंड मागणी होती. २०१५ पासून राष्ट्रीय हातमाग हा दिवस आपण साजरा करीत आहोत. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेला न्याय देत येथे उपलब्ध असलेल्या सुविधांचा पुरेपूर वापर करणे आवश्यक असल्याचे डॉ व्ही एल धारूरकर यांनी यावेळी सांगितले.

एमजीएम विद्यापीठात आपल्याला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. आपण आपल्या सृजनशीलतेचा वापर करीत उत्पादने तयार केली पाहिजेत, असे प्रतिपादन खादी विभाग संचालक शुभा महाजन यांनी केले.

विविध स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. फॅकल्टीसाठी आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये प्रा आरती साळुंके आणि प्रतिभा पाटील यांनी पारितोषिक प्राप्त केले. ‘ट्रॅडिशनल हॅन्डलूम पॅटर्न्स, दि लाईफ ऑफ अ वेव्हर, सस्टेनेबल फॅशन’ ही पोस्टर मेकिंग स्पर्धेची थीम ठेवण्यात आली होती. हँडमेड पोस्टर स्पर्धेत साक्षी तांदळीकर आणि तनिष्का चव्हाण या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केला. श्रेया मोलोडे आणि ऐश्वर्या देवकर या विद्यार्थिनींनी डिजिटल पोस्टर स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page