राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेती नयन बारगजेचा श्री बंकटस्वामी महाविद्यालयात गौरव सोहळा
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयाची विद्यार्थिनी भारत सरकारच्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन तर्फे आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या नयन बारगजे हिने तायक्वांदो खेळात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय यशाचा सन्मान म्हणून श्री बंकटस्वामी महाविद्यालयात तिचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे, उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे, डॉ ब्रम्हनाथ मेंगडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ शंकर धांडे, डॉ रामराजे आवारे, कार्यालयीन अधीक्षक शिवाजी भारती, वरिष्ठ लिपिक कल्याण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

हल्दवानी (उत्तराखंड) येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत ४९ किलो वजन गटात नयन बारगजे हिने अंतिम फेरीपर्यंत दमदार खेळ करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत रौप्यपदक जिंकले. सत्कार सोहळ्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी नयनच्या यशाचा आनंद साजरा केला. डॉ अविनाश भारताचे व प्रवीण सोनकुल यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. श्री बंकटस्वामी महाविद्यालयासाठी व बीड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला हा एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. या सत्कार समारंभ प्रसंगी बीडमध्ये क्रीडाप्रेमी व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित.