नागपूर विद्यापीठात महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अँड कॉलेज लायब्ररीयन असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न
ग्रंथपालांचे ज्ञान जतनाचे कार्य – डॉ समय बनसोड
भारतीय ज्ञान परंपरेला तंत्रज्ञानाची जोड द्या – डॉ हरेराम त्रिपाठी
नागपूर : ग्रंथपालांकडून ज्ञान जतन करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राज्यपाल नामीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ समय बनसोड यांनी केले. महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अँड कॉलेज लायब्ररीयन असोसिएशनचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेज मधील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात २२ व २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. इंडियन लायब्ररी असोसिएशन (आयएलए), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर ज्ञान स्त्रोत केंद्र, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अधिवेशनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात डॉ बनसोड मार्गदर्शन करीत होते.


उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयएलएचे अध्यक्ष डॉ मोहन खेरडे यांनी भूषविले, कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ हरेराम त्रिपाठी, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, आयएलए कोषाध्यक्ष डॉ धरम कुमार, मुकलाचे सरचिटणीस डॉ विनय पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ देवेंद्र भोंगाडे, डॉ डी आर देशपांडे, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ विजय खंडाळ, डॉ धनंजय देवते, डॉ धनंजय गभने, डॉ दीपक कापडे, डॉ सुनील नारनवरे, डॉ सारिका पाटील, डॉ चंद्रमणी गजभिये, डॉ राजेंद्र माणिकपुरे डॉ रामानिक लेंगुरे यांची उपस्थिती होती.
‘नेक्स्ट जनरेशन लायब्ररीज : एक्सप्लोरिंग इमर्जिंग ट्रेंड्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात मोठे लोक तयार करण्याचे ग्रंथपाल केंद्र म्हणून कार्य करीत असून आपण भाग्यवान असल्याचे डॉ समय बनसोड पुढे बोलताना म्हणाले. १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाती पुस्तक मिळाले आणि ते संविधान निर्माते झाले. एक पुस्तक हाती पडले अन् मोहनदास गांधी हे महात्मा झाले. आपणांसमोर अनेक समस्या असल्या तरी आपण आशावादी आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) समस्या नव्हे तर संधी समजावे. ए आयच्या माध्यमातून ग्रंथालय क्षेत्राला समृद्ध करावे, असे आवाहन डॉ. बनसोड यांनी केले. विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून राष्ट्रीय ई-पुस्तक सुरू झाले आहे. देशातील २३ भाषांमध्ये डिजिटल पुस्तके तयार होत आहे. भारतीय भाषा पुस्तक स्कीमच्या माध्यमातून अनेक पुस्तके डिजिटल स्वरूपात येत आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच डिजिटल युगात ग्रंथालयांनी अपडेट होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय बुक महोत्सव २२ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित केल्या जात असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन डॉ बनसोड यांनी यावेळी केले.
भारतीय ज्ञान परंपरेला तंत्रज्ञानाची जोड द्या – डॉ हरेराम त्रिपाठी
राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ हरेराम त्रिपाठी यांनी भारतीय ज्ञान परंपरेला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे आवाहन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या माध्यमातून देशातील शिक्षण पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न केल जात आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असून भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिकतेची जोड देत समोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालय समृद्ध असल्याने पूर्वी भारतीय शिक्षण पद्धती समृद्ध होती. विविध देशातून नागरिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी भारतात येत होते. शिक्षणातून आर्थिक, सामाजिक समृद्धी प्राप्त होते. प्राचीन ग्रंथसंपदा, पांडूलिपीचे डिजिटलायझेशन करीत समाजासमोर आणण्यात ग्रंथालयाचे मोठे महत्त्व असल्याचे डॉ त्रिपाठी यांनी सांगितले.
पुस्तकातून घडले त्यांनी देश घडविला, असे प्रतिपादन प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी केले.
आपणाकडे पूर्वी समृद्ध असे ज्ञान भंडार होते. देशाला महासत्ता घडविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करणे आवश्यक असून अपडेट राहण्यासाठी ग्रंथ डिजिटल करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे असे त्यांनी सांगितले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ देवेंद्र भोंगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रंथपाल समाजाला ज्ञान देण्याचे पुण्यवान काम करतो. समाजातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ मोहन खेरडे यांनी वाचन शिक्षण प्रणालीत ग्रंथालयाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ग्रंथालयाचा बास्केट म्हणून समावेश केल्याने त्यांनी आभार मानले. ग्रंथालयाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने ग्रंथालय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. प्रत्येक पीडित ग्रंथपालांनी महत्त्वपूर्ण कार्य केले असून कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यानंतर देखील प्रत्येक तंत्र ग्रंथपाल आत्मसात करेल असा विश्वास डॉ खेरडे यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक करताना डॉ डी आर देशपांडे यांनी अधिवेशनाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. डिजिटल युगात होत असलेल्या अधिवेशनात भविष्यकालीन समस्या तसेच संधीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुकलाचे सरचिटणीस डॉ विनय पाटील यांनी संघटनेची स्थापना ते आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती अहवाल वाचन करताना दिली. विविध पुरस्कार तसेच आगामी काळात ग्रंथालयातील कर्मचारी आकृतीबंधात बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ प्रदीप बारड यांना तर उत्कृष्ट संशोधक पुरस्कार डॉ अनूप दिक्षीत व डॉ वंदना गवळी यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ मंजू दुबे यांनी केले तर आभार डॉ धनंजय गभने यांनी मानले. अधिवेशनात १७९ संशोधन पेपर प्राप्त झाले आहे. अधिवेशनाला महाराष्ट्रसह इतर राज्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.