नागपूर विद्यापीठात लोकप्रशासन विभागाच्या हिरक महोत्सव निमित्त राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

लोकशाही विकासावर अवलंबून – डॉ रूमकी बसू

नागपूर : देशातील लोकशाही ही प्रामुख्याने विकासावर अवलंबून आहे. लोकशाहीत तटस्थता असणे आवश्यक असून सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य असावे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील सार्वजनिक धोरण आणि सामाजिक विज्ञान सरकारी संस्था केंद्राच्या प्रमुख डॉ रूमकी बसू यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद कॅम्पसमधील डॉ ए के डोरले सभागृहात शुक्रवार, दिनांक २७ व शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडली. यावेळी बीजभाषण करताना डॉ बसू मार्गदर्शन करीत होत्या.

राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील भारतीय लोकप्रशासन संस्थेचे डॉ सुरेश मिश्रा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा ई वायूनंदन, दिल्ली येथील सार्वजनिक धोरण आणि सामाजिक विज्ञान सरकारी संस्था केंद्राच्या प्रमुख डॉ रूमकी बसू, विद्यापीठ लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ जितेंद्र वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ बसू यांनी लोकशाहीकडून वास्तविक लोकशाहीकडे होत असलेल्या प्रक्रियेचे वर्णन केले.

Advertisement

डॉ सुरेश मिश्रा यांनी भाषणातून लोकप्रशासनाच्या शिक्षणात आणि संशोधनात संतुलन राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या भूमिकेवर चर्चा करताना त्यांनी संस्थेच्या योगदानाचा उल्लेख केला. संस्थेला आवश्यक अनुदानाचे फक्त ४० टक्के मिळत असूनही, संस्थेचे संस्थापक पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा संस्थेत कायम आहे, असे त्यांनी सांगितले. माजी कुलगुरू प्रा ई वायूनंदन यांनी नवे शिक्षण धोरण विद्यार्थी हिताचे असल्याचे सांगत यामुळे विद्यार्थी त्यांच्या कुवतीप्रमाणे विषय निवडू शकतील, असे सांगितले. विभागाच्या योगदानाबद्दल कौतुक केले आणि महाराष्ट्रातील आपणास आलेल्या अनुभवाची माहिती दिली. आयुष्यात प्रॅक्टिकल राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विभाग प्रमुख डॉ जितेंद्र वासनिक यांनी त्यानंतर विभागाचा इतिहास सांगितला. विभागाचे संस्थापक प्रा एम पी शर्मा यांचा उल्लेख केला आणि या विभागाची आशियातील पहिली अशी ओळख कशी निर्माण झाली याचे वर्णन केले. त्यांनी विभागाच्या इतर महत्त्वपूर्ण प्रमुखांपैकी व्ही एस मूर्ती, एस एल दवे, नीलिमा देशमुख आणि डॉ निर्मलकुमार सिंह यांचे विभागाच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे असे सांगितले.

यावेळी विभागाचा ७५ वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ सुप्रिया डेव्हिड यांनी प्रास्ताविक केले. संशोधक विद्यार्थिनी व इतर प्रतिनीधींचे मेघना मंडल यांनी आभार मानले. आयोजनात डॉ धर्मेंद्र तुरकर, प्रा रमण शिवणकर, प्रा अंकुश मराठे, प्रा श्रीवर्धन केकतपुरे, जुही मिश्रा, लिंटा टॉमसन यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page