अमरावती विद्यापीठात ‘‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी’’ विषयावर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
राष्ट्रीय परिषदेतून समाजाला उपयुक्त नाविन्यपूर्ण संशोधनावर विचारमंथन होईल – कुलगुरू
अमरावती : जगभरामध्ये विविध संशोधने सुरु आहेत, असे असले तरी भारतामध्ये होणारी संशोधने समाजाच्या उपयोगी व्हायला पाहिजे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील राष्ट्रीय परिषदेतून समाजाला उपयुक्त नाविन्यपूर्ण संशोधनावर विचारमंथन होवून सहभागी संशोधकांमधून नाविन्यपूर्ण संशोधनाचे आदानप्रदान होईल आणि त्या माध्यमातून उदयोन्मुख संशोधकांना चालना मिळेल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रासायनिक तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी’’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कोकुयो कॅमलिन लिमीटेड, मुंबईच्या मॅन्युफॅक्चरींग कन्ट्रोलींगचे अध्यक्ष किशोर वठे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, आयोजक सचिव डॉ. गजानन मुळे व संयोजक डॉ. अनिल नाईक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. पुढे बोलतांना कुलगुरू म्हणाले, शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्याकरीता संशोधनातून नवकल्पना पुढे नेण्यासाठी आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन पुढे आणण्यासाठी, त्याचा फायदा समाजाला होण्यासाठी, अशाप्रकारच्या परिषदेचे महत्व अधिक असते. या परिषदेमधून संशोधनपूर्ण ज्ञानाची व कल्पनांची वैचारिक देवाणघेवाण शैक्षणिक, उद्योग व धोरणकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधून विकसिनशील समाजनिर्मिती करण्याकरीता सुद्धा फायदेशीर ठरते. उदयोन्मुख संशोधकांना संशोधनाकरीता चालना मिळावी, समाजाला उपयोगी विषयावर संशोधन व्हावे, या उद्देशाने या परिषदेत विचारमंथन होईल आणि भविष्यामध्ये समाजाला त्याचा निश्चितच फायदा होईल, अशी आशा कुलगुरूंनी व्यक्त केली.
उद्घाटन झाल्याची घोषणा प्रमुख अतिथी किशोर वठे यांनी केली. ते पुढे म्हणाले, सध्याच्या युगात टेक्नॉलॉजी आपल्या हातात आलेली आहे. दहा-वीस वर्षानंतर टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल होतील, परंतू त्या सर्व टेक्नॉलॉजीचा मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी उपयोग व्हायला हवा. अशाप्रकारच्या परिषदेतून समाजपयोगी संशोधनावर भर दिल्या जाईल, असेही ते म्हणाले.
डॉ प्रवीण रघुवंशी म्हणाले, आज नॅनो टेक्नॉलॉजीला खूप महत्व प्राप्त झाले आहे. संरक्षण, आकाश, संदेशवहनामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मानवी जीवन सुकर होण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीतील संशोधन निश्चितच उपयुक्त ठरेल, तसेच ही परिषद उदयोन्मुख संशोधकांकरीता मैलाचा दगड ठरेल, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
विद्यापीठ गीताने परिषदेला सुरुवात झाली. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे किशोर वठे यांचा कुलगुरूंनी शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. स्वागतपर भाषण आयोजक सचिव डॉ गजानन मुळे यांनी, तर पाहुण्यांचा परिचय संयोजक डॉ अनिल नाईक व डॉ अनिल राठोड यांनी करुन दिला. संचालन तृप्ती बारबुदे यांनी, तर आभार डॉ पी के वानखडे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला न न सा संचालक डॉ अजय लाड, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ यादवकुमार मावळे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ नितीन फिरके, आयआयएलचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांचेसह देशभरातील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.