नागपूर विद्यापीठाच्या डॉ. स्मिता आचार्य यांना स्वीडन येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादरीकरणासाठी निमंत्रण

भारत सरकारच्या ANRF कडून आंतरराष्ट्रीय सहभागासाठी आर्थिक सहाय्य मंजूर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. स्मिता अतुल आचार्य यांना स्वीडन येथे होणाऱ्या १९ व्या आंतरराष्ट्रीय सॉलिड ऑक्साइड फ्युएल सेल्स परिषदेत (SOFC-XIX) मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही परिषद १३ ते १८ जुलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

बुधवार, १६ जुलै २०२५ रोजी डॉ. आचार्य या “Nanostructural Architectures of Composite of Multiple Doped Ceria and Perovskite Proton Conductors for Low-Temperature SOFCs” या विषयावर सादरीकरण करतील. कमी तापमानात कार्यरत असणाऱ्या सॉलिड ऑक्साइड फ्युएल सेल्स (LT-SOFCs) साठी प्रगत साहित्य संरचना विकसित करण्यावर त्यांचे संशोधन आधारित आहे.

Advertisement

या महत्त्वाच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (ANRF) — भारत सरकारच्या अधिनियमाने स्थापन केलेली स्वायत्त संस्था — यांनी डॉ. आचार्य यांना या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. यामध्ये इकॉनॉमी क्लास हवाई प्रवास, व्हिसा शुल्क आणि विमानतळ कर यांचा समावेश आहे.

डॉ. आचार्य यांच्या या निवडीमुळे आणि राष्ट्रीय अनुदानाच्या मान्यतेमुळे नागपूर विद्यापीठातील संशोधन कार्याची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. स्वच्छ व कार्यक्षम ऊर्जा क्षेत्रात भारतीय संशोधकांच्या जागतिक सहभागाला चालना देण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पावले ठरली आहेत.

विद्यापीठ प्रशासनातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, हा सन्मान संपूर्ण शैक्षणिक समुदायासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *