राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूंनी घेतली विभाग प्रमुखांची बैठक

विभाग प्रमुखांना १०० दिवसांचा कृती कार्यक्रम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांच्या कार्यास गती यावी म्हणून सर्व विभाग प्रमुखांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम देण्यात आला आहे. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी याबाबत नुकतीच बैठक आयोजित करीत सर्व विभाग प्रमुखांना कृती कार्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यापीठाकडून संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाते. अशाच प्रकारे सर्व शैक्षणिक उपक्रम, संशोधन, अभ्यासक्रम तसेच परीक्षा सुरळीत होत निकाल तातडीने घोषित व्हावे यासाठी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम विभाग प्रमुखांना देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयमं, मूक, एनपीटीएल त्याचप्रमाणे विविध ऑनलाइन कोर्सेसबाबत विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती व्हावी याचे नियोजन केले जाणार आहे. विद्यापीठाची एनआयआरएफ रँकिंग कशा प्रकारे वाढवता येईल, त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना डॉ काकडे यांनी यावेळी केल्या.

Advertisement

या सोबतच विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, एआयसीटीई या संस्थांकडून अधिकाधिक संशोधन प्रकल्प प्राप्त होतील, या दृष्टीने संशोधन प्रकल्प सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.‌ शासकीय प्रमाणेच खाजगी क्षेत्रात देखील संशोधन प्रकल्प आपणास घेता येतो, असे डॉ. काकडे यांनी यावेळी विभाग प्रमुखांना सुचविले. विद्यापीठाच्या रुसा केंद्रात असलेल्या विविध संशोधन उपकरणाचा लाभ विद्यापीठासह महाविद्यालये तसेच अन्य विद्यापीठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील घेता येतो याबाबत जनजागृती निर्माण करण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले.

संशोधन पेपर, पेटंट वाढविण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना, इंटर्नशिप, टीसीएस, इन्फोसिस यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करण्याबाबत विविध अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्योगाची माहिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांची औद्योगिक शैक्षणिक सहल आयोजित करावी. त्याचप्रमाणे विद्यापीठातून भारतीय ज्ञान परंपरेबाबत अधिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्याबाबत चर्चा केली.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट कार्यक्रम वाढविण्यात सूचना त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे कामकाजाला गती मिळावी म्हणून डिजिटल प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी बैठकीला विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page