राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
पदव्युत्तर तत्त्वज्ञान विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या तत्व पदव्युत्तर तत्त्वज्ञान विभागात ‘जीवनानंतरही जीवन द्या’ अशा आशयाचा अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मानव विज्ञान विद्याशाखा इमारतीतील सभागृहात बुधवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित कार्यक्रमात या विषयावर विशेष व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन पदव्युत्तर तत्त्वज्ञान विभाग, पदव्युत्तर समाजशास्त्र आणि सामाजिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.


या कार्यक्रमात ‘जीवनानंतरही जीवन द्या’ या महत्त्वपूर्ण विषयावर अतिथी व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश अवयवदानाचे महत्त्व आणि त्यामागील जीवन बदलवणाऱ्या संधींची जाणीव लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ धीरज कदम यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर, संचालन करणाऱ्या पायल यांनी मान्यवरांचे परिचय करून दिले. या व्याख्यानासाठी “मोहन फाउंडेशन” या अवयवदान क्षेत्रातील प्रसिद्ध संस्थेचे मान्यवर, प्रकल्प व्यवस्थापक वीणा वाठोरे आणि ब्रँड ॲम्बेसेडर देवांग छाया उपस्थित होते.
देवांग छाया यांनी अवयवदानाच्या महत्त्वावर जोर देत, लोकांना या जीवनदायी कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन कसे द्यावे, याविषयाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण संवाद साधला. वीणा वाठोरे यांनी मोहन फाउंडेशनच्या कार्याचे तपशीलवार विवेचन केले आणि अवयवदान प्रक्रियेत व सहाय्य सेवांमध्ये संस्थेची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचा समारोप समाजशास्त्र आणि सामाजिक कार्य विभागाच्या प्रमुख डॉ अपर्णा समुद्र यांच्या आभाराने झाला. त्यांनी मान्यवर वक्ते आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन सबा कौसर यांनी केले. या व्याख्यानातून अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित होऊन, विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना या जीवनदायी कृतीची जाणीव करून देण्यात आली. ज्यामुळे “जीवनानंतरही जीवन द्या” या विचाराला प्रोत्साहन मिळाले.