राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ललित कला पदविकेच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

विद्यापीठाच्या ललित कला विभागात बीएफए समक्ष ब्रीज कोर्सेस सुरू

चित्रकला, सांस्कृतिक, उपयोजित कला आदी अभ्यासक्रमांचा समावेश

नागपूर : ललित कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदविका प्राप्त विद्यार्थ्यांसाठी पुढील उच्च शिक्षणाची संधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. याकरिता विद्यापीठाच्या पदव्युत्तर ललित कला विभागात बीएफए समक्ष विविध ब्रीज कोर्सेस नव्याने सुरू करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला, सांस्कृतिक कला तसेच उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) आदी विविध कला अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांचा लाभ विविध कला महाविद्यालयातून पदविका प्राप्त केलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे.

विदर्भातील विविध चित्रकला महाविद्यालयांमधून ललित कला पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी समकक्ष शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे ललित कला पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी तसेच पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बीएफए समकक्ष अभ्यासक्रम नसल्याने असंख्य पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून मुकावे लागत होते. बीएफए समकक्ष अभ्यासक्रम केवळ छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी जाण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर येत होती. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सेमिस्टरचा बीएफए समकक्ष असा अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सेस) तयार केला आहे.

विद्यापीठातील पदव्युत्तर ललित कला विभागात चित्रकला, सांस्कृतिक कला तसेच उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) आदी विविध प्रकारच्या कला विषयातील १ वर्षांचा अर्थात २ सेमिस्टरचा अभ्यासक्रम या शैक्षणिक क्षेत्रापासून सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने अनुमती दिल्याने १५ जुलै पासून या ब्रिज कोर्सेस करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ३१ जुलै २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

विदर्भात अनेक चित्रकला महाविद्यालय आहेत. येथील पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठातून पदवी प्राप्त करण्याकरिता २०१७ पासून पात्रता नव्हती. परिणाम स्वरूप खाजगी शाळा, शासकीय संस्थेमध्ये अशा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत नव्हती. मात्र, ललित कला विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ब्रिज कोर्सेसमुळे असंख्य ललित कला पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी मिळविण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. दोन सेमिस्टरचा ब्रिज अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना बीएफए समकक्ष पदवी प्राप्त होणार असून पदव्युत्तर पदवी एमएफए तसेच आचार्य पदवी (पीएचडी) देखील प्राप्त करता येणार आहे.

ललित कला विभागामध्ये ब्रिज कोर्सेस सुरू व्हावेत म्हणून विद्यापीठाचे राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. विभागामध्ये सुरू करण्यात आलेले ब्रिज कोर्सेस स्वयंअर्थसहाय्यीत असले तरी अभ्यासक्रमाचे माफक शुल्क राहणार आहे.

कौशल्यपूरक अभ्यासक्रम
नव्याने सुरू करण्यात आलेल्या ब्रिज कोर्सेसचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कलाक्षेत्रातील विशेष कौशल्य विकसित व्हावे म्हणून कौशल्य विकासावर अभ्यासक्रमांमध्ये विशेष भर देण्यात आला आहे. कौशल्य तसेच संशोधनपूरक अभ्यासक्रमाची रचना असल्याची माहिती आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ राजश्री वैष्णव यांनी दिली. दोन सेमिस्टरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना या ललित कला प्रकारातील विशेष कौशल्य प्राप्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com