राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चिमणी दिवसाच्या निमित्ताने पक्षांसाठी लावले जलपात्र
विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागातील रासेयोचा उपक्रम
नागपूर : जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पक्षांसाठी जलपात्र लावण्यात आले आहे. पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हा उपक्रम गुरुवार, दि २० मार्च २०२५ रोजी राबविण्यात आला.

कुलसचिव डॉ राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ ओमप्रकाश चिमणकर, वरिष्ठ प्राध्यापक डॉ संजय ढोबळे यांच्या उपस्थितीत विद्यापीठ परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. उन्हाळा सुरू होत असून पक्षांना तृष्णा भागविण्यासाठी वन वन भटकावे लागते. पाण्यासाठी जीव कासावीस झाल्याने असंख्य पक्षाचे मृत्यू होतात. ही बाब लक्षात घेता भौतिकशास्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दरवर्षी पक्षांसाठी जलपात्र लावण्याचा कार्यक्रम राबविला जातो.
रासेयो विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ संजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ परिसरात विविध ठिकाणी झाडांना जलपात्र बांधत त्यामध्ये पाणी टाकले. यावेळी मोठ्या संख्येने रासेयो सयंसेवक उपस्थित होते.