नागपूर विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागात ‘जल्लोष’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गृहविज्ञान विभागात ‘जल्लोष’ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम गुरुवार, दि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ वंदना धवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी लिंबू शर्यत, ब्रेक रेस, बॅलून रेस आणि संगीत खुर्ची अशा खेळांमध्ये सहभाग घेतला. तसेच रेसिपी स्पर्धा, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फुलांची सजावट स्पर्धा, साडी स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. स्पर्धेचे मूल्यांकन औषधी निर्माण शास्त्र विभागातील डॉ वीणा बेलगमवार यांनी केले. स्पर्धांचे निकाल लागल्यानंतर विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉ वंदना धवड आणि प्रमुख पाहुणे म्हणून पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ पायल ठावरे यांची उपस्थिती होती. विभागातील सर्व शिक्षक डॉ शुभदा जांभुळकर, डॉ प्राजक्ता नांदे, डॉ तूलिका खरे आणि योगदान देणारे शिक्षकही उपस्थित होते. विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रे डॉ पायल ठावरे यांनी वितरित केली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ वंदना धवड यांनी केले, तर प्रमुख अतिथी डॉ पायल ठावरे यांनी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे समन्वयन डॉ तूलिका खरे यांनी केले आणि आभार मीनाक्षी सुरपांडे यांनी मानले.
पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गीत, समूह गीत, रॅप गाणी, नृत्य, समूह नृत्य, सोलो डान्स, ड्युएट डान्स, पोरोडी, शायरी आणि फॅशन शो यांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयन मुनिरा नाझमी यांनी केले तर आभार अर्जिया सिद्दीकी हिने मानले. खाद्य विज्ञान आणि पोषण तसेच संसाधन व्यवस्थापन या दोन विभागातील दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमधील एकूण ४४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गानेही सहकार्य केले.