राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात ‘काव्यास्वाद, व्याख्यानसत्र’ संपन्न
‘हायकू’ हा दृश्यअर्थाला कलाटणी देणारा प्रभावी काव्यप्रकार – कवयित्री व लेखिका मेघना साने यांचे प्रतिपादन
हेमांगी नेरकर यांचा सहभाग
नागपूर : ‘हायकू’ ही पहिल्या दोन ओळींनंतर तिसऱ्या ओळीत अर्थाला कलाटणी देणारी काव्याची रचनापद्धती आहे. पहिल्या दोन ओळींत समोरील दृश्याचे वर्णन करणे आणि तिसऱ्या ओळीत त्या दृश्यअर्थाला देण्यात येणारी कलाटणी काव्यरूपाचा प्रभावी आणि वेगळा काव्यास्वाद देणारा आहे’, असे प्रतिपादन कवयित्री व लेखिका मेघना साने (मुंबई) यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्यावतीने ‘मराठी काव्यास्वाद : विशेष व्याख्यान सत्रां’तर्गत ‘मराठी हायकू आणि त्याची वाटचाल’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अतिथी कवयित्री व लेखिका मेघना साने (मुंबई) तसेच ‘आरती प्रभू यांची कविता’ विषयावर कवी आरती प्रभू (चि त्र्यं खानोलकर) यांच्या कन्या हेमांगी नेरकर (मुंबई) यांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागात आयोजित या सत्रांच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे होते.
व्याख्यान सत्राच्या सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘मराठी हायकू आणि त्याची वाटचाल’ या विषयावर विवेचन करताना मेघना साने यांनी ‘हायकू’ या जपानमध्ये १७ व्या शतकात सुरु झालेल्या या काव्यप्रकाराच्या इतिहासाला उजाळा दिला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे १९१६ मध्ये जपानला गेले असता त्यांनी या काव्यप्रकाराबद्दल ऐकले आणि या काव्याची भारताला ओळख करून दिली. सुरुवातीला येथील साहित्य क्षेत्राला ही तीन ओळींची कविता कविताच वाटली नाही. त्यानंतर मात्र, पाच-सात-पाच शब्दांच्या आकृतीबंधातील या काव्यप्रकाराच्या भारतातील रुजुवातीस सुरुवात झाली. कवयित्री शिरीष पै यांनी हा काव्यप्रकार मराठी मातीत रुजविला. सोपे लिहून त्यातून जीवनाचा अर्थ काढणे कठीण आहे. हायकू हा काव्यप्रकार हाताळताना त्यात रिदम आणि त्यातील अर्थ जपला पाहिजे’, अशी अपेक्षाही साने यांनी व्यक्त केली.
भर माध्यान्न
झाडे स्तब्ध उभी
सोसत उन्हं
अशा ‘हायकू’ या काव्यप्रकारातील विविध रचनाही त्यांनी यावेळी सादर केल्या.
‘आरती प्रभू यांची कविता’ विषयावर बोलताना कवी आरती प्रभू (चि त्र्यं खानोलकर) यांच्या कन्या हेमांगी नेरकर यांनी वडिलांसोबतच्या आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. खानोलकर यांच्या ‘रखेली’, ‘माकडाला चढली भांग’ आदी नाटकांना रसिकांच्या मिळालेल्या प्रतिसादाला उजाळा दिला. वडिलांना न सांगता त्यांच्या नाटकाच्या प्रयोगाला गेले असता वडिलांनी आम्हाला थिएटरमधून बाहेर काढले होते’, अशा वडिलांच्या आठवणींना नेरकर यांनी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे यांनी, मराठी कवितेचा विचार करताना त्याला दीर्घ रूपाची परंपरा असल्याचे सांगितले. गद्यरूपातून व्यक्त करता येणारे सार कविता रूपातून नेमकेपणाने व्यक्त करता येते. कविता रूपातून ती रचनाकार्याच्या अर्थात कवीच्या मनाच्या अंतर्मनाचे दर्शन घडविते. ‘हायकू’ हा काव्य हा आत्मसंवाद करतानाच जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारा साहित्य प्रकार आहे. मराठी साहित्याचा विचार करता आरती प्रभू, जी ए कुलकर्णी, कविवर्य ग्रेस यांनी खऱ्या अर्थाने वांङ्मयाला वांङ्मयरूप प्राप्त करून दिले. आरती प्रभू यांनी कोकणाच्या भूमीतून जीवनाकडे बघण्याची दृष्टी जागिवली, असे विवेचन केले. प्रास्ताविक डॉ अमृता इंदूरकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा अमित दुर्योधन यांनी केले. प्रा समीर कुमरे यांनी आभार मानले. या काव्यास्वाद व्याख्यानसत्राला विभागातील तसेच संशोधक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.