नागालॅण्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे यांचा नागपूर विद्यापीठाच्या विधी विद्यार्थ्यांसोबत संवाद
विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक विधी विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विधी विभागात नागालँडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे यांचे अतिथी व्याख्यान पार पडले. विभागातील माजी विद्यार्थी म्हणून तामगाडगे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.


पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ पायल ठावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी व्याख्यान तसेच विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तामगाडगे यांचे स्वागत करून डॉ पायल ठावरे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. तामगाडगे यांनी विद्यार्थ्यांना ‘स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि विशेष गुन्हेगारी कायदे’ याबाबत मार्गदर्शन केले. काळा पैसा प्रतिबंधक कायदा (PMLA), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, सशस्त्र दल (विशेषाधिकार) कायदा (AFSPA) त्याचप्रमाणे पोक्सो, युएपीए, शस्त्र हाताळणी कायदा आणि एनडीपीएस कायदा या विषयावर तामगाडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कायद्याची अंमलबजावणी करताना कशाप्रकारे विविध कठोर कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागते याचे अनुभव कथन त्यांनी यावेळी केले. भारतीय प्रशासकीय सेवेत आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विधी शिक्षणाची कशाप्रकारे गरज असते याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. सोबतच विधीक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत घेण्याकरिता तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. विभागातील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सक्रियपणे चर्चेत सहभाग घेतला त्यामुळे सत्र अधिक संवादात्मक बनले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकेच नव्हे तर कायदा आणि प्रशासकीय सेवेमध्ये करिअर करण्याबाबत अमूल्य मार्गदर्शन प्राप्त झाले. कार्यक्रमाचे आभार ऋचा कोचर यांनी मानले.