वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजला कमी कालावधीत नॅक “ए” मानांकन
कोडोळी : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोडोली यांना राष्ट्रीय मूल्यमापन समिती (नॅक) बेंगलोर यांच्याकडून ए ग्रेड (CGPA ३.०७) मानांकन मिळाले. २०१७ पासून चालू झालेल्या बी फार्मसी शैक्षणिक अभ्यासक्रम ते आतापर्यंतचे मूल्यमापन करण्यात आले या मूल्यमापनामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. फार्मसी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद मूल्यांकन प्राप्त झाले.
या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, महाविद्यालयात वापरली जाणारी शैक्षणिक प्रणाली, अभ्यासक्रमाचे नियोजन, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, संशोधनकार्य, माजी विद्यार्थी व पालक अभिप्राय , समाज उपयोगी उपक्रम, सुविधा क्रीडा, विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया, सांस्कृतिक विभागाची कामगिरी, पर्यावरण पूरकता यांचा प्रामुख्याने समावेश केला गेला होता. महाविद्यालयाचा अहवाल प्राचार्य डॉ ए एस मंजप्पा व नॅक समन्वयक डॉ गौरीसंकर यांनी सादर केला. मूल्यांकन प्रक्रियेत सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक , माजी विद्यार्थी व विविध आस्थापनाच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील सचिव डॉ.जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. हे राष्ट्रीय मानांकन पाच वर्षासाठी आहे, त्यामुळे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ कोल्हापुराच्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये समाविष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता विद्यापीठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध केलेली असुन या महाविद्यालयांमध्ये डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी तसेच फार्म डी हे अभ्यासक्रम शिकवले जातात अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक वैशाली पोवार यांनी दिली. या आनंदोत्सवात महाविद्यालयाचे इतर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतील कर्मचारी उपस्थित होते.