एमजीएम विद्यापीठात ‘सूर संविधानाचे’ संगीत मैफल थाटात संपन्न
मानवी मूल्यांसोबत सूर-तालांची बरसात…
भारतीय संविधानावरील देशातील पहिली संगीत सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : समस्त भारतीय नागरिकांच्या रक्षणाचे कवचकुंडल असलेल्या भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी उपक्रमाचा भाग म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सूर संविधानाचे’ही विशेष संगीत मैफल एमजीएम विद्यापीठाच्या वतीने शनिवार दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झाली. भारतीय संविधानावर केंद्रित असलेली देशातील ही पहिलीच संगीत मैफल प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सादर करण्यात आली. संविधानात अंतर्भूत असलेल्या मानवी मूल्यांसोबत सूर-तालांची अनोखी बरसात श्रोत्यांनी या मैफलीत मनसोक्त अनुभवली.
एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकार झालेल्या या मैफलीचे उद्घाटन संविधान फाऊंडेशन, नागपुर येथील माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनी सुरूवातीला व त्यांच्या मागोमाग श्रोत्यांनी सामूहिक पद्धतीने संविधान उद्देशिकेचे वाचन करून आगळया-वेगळ्या पद्धतीने मैफलीचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटकीय मनोगतात भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे संविधानातील ध्येय आणि उद्दिष्टांचा आरसा आहे असे सांगत त्यांनी आपल्या सनदी सेवाकाळात संविधानावर केलेल्या कामांचा लेखाजोगा मांडला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी संविधानाचे महत्व आणि त्याची वर्तमान काळात असलेली निकड स्पष्ट केली. या प्रसंगी एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशीष गाडेकर व रेखा खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सतत नवनवीन संगीत रचना करून सामाजिक उन्नयनासाठी त्याचा उपयोग करणारे प्रयोगशील संगीतकार आणि स भु कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख प्रो संजय मोहड यांनी महाकवी डॉ वामनदादा कर्डक यांच्या निवडक गीतांमधून या विशेष संगीत मैफलीची निर्मिती केली. मेधा लखपति, विद्या धनेधर, सुप्रिया खरात, पुनम साळवेआणिवैष्णवी लोळे या विद्यार्थीनी कलावंतांनी या संगीत मैफलीतगायन केले. निरंजन भालेराव (बासरी), अनुप कुल्थे (व्हायोलिन), रोहन शेटे (तबला), राहुल जोशी (सहतालवाद्य) यांनीसाथसंगत केली. आपल्या आशयगर्भ निरुपणातून डॉ संजय मोहड यांनी भारतीय संविधानातील अनेक पदर अलगदपणे उकलून दाखवित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आम्ही भारताचे लोक (हंसध्वनि), स्वातंत्र्याचा अर्थ (खमाज), जागे रहा (मांड), भीम माझा (मारू बिहाग), लोकशाहीचा पोवाडा (खमाज), मी एकता आहे (मिश्र खमाज), इथे गीत माझे (अल्हैय्या बिलावल), दिल्ली दरबार (चारुकेशी) आणि भीमा विचार तुझा (कौशी कानडा, भैरवी) या गीतांनी श्रोत्यांना संवैधानिक मूल्यांची जाणीव अधोरेखित करीत कृतीशीलतेची अनुभूति दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे प्रमुख प्रा शिव कदम यांनी केले. जाणकार श्रोत्यांनी अत्यंत अभ्यासू वृत्तीने या अनोख्या संगीत मैफलीचे श्रवण केले.