महात्मा फुले कृषि विद्यापीठात वसुंधरा दिवस-२०२४ निमित्त पृथ्वी विरुध्द प्लॅस्टिक कार्यक्रम संपन्न

प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल – कुलगुरु डॉ पी जी पाटील

राहुरी : दिवसेंदिवस प्लॅस्टिकची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाबरोबरच मानवी जीवनावरही होताना दिसत आहे. एका झालेल्या संशोधनानुसार मानवाच्या संपुर्ण अयुष्यात २० किलोपर्यंत प्लॅस्टिक त्याच्या पोटात जात आहे. या मायक्रोप्लॅस्टिकमुळे कॅन्सर तसेच विविध रोगांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. अशा या प्लॅस्टिकला बंधी हा पर्याय नाही तर प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ अण्णासाहेब शिंदे सभागृहात इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स, अहमदनगर लोकल सेंटर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ व अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने वसुंधरा दिवस-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची थीम पृथ्वी विरुध्द प्लॅस्टिक ही होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ पी जी पाटील बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधाकर यारलागड्डा प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

यावेळी इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स, अहमदनगर लोकल सेंटरचे अध्यक्ष इंजि एम एम अनेकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ दिलीप पवार, अहमदनगरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, अहमदनगर येथील सारस प्लॅस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक पी एस गांधी, कार्यक्रमाचे आयोजक डॉ अतुल अन्ने, डॉ विरेंद्र बारई व अभियांत्रिकी संस्थेचे मानद सचिव इंजि अभय राजे उपस्थित होते.

Advertisement

यावेळी कुलगुरु डॉ पाटील पुढे म्हणाले की आपल्याला प्लॅस्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शोधावे लागणार आहे. यामध्ये प्लॅस्टिकवर जगणाऱ्या सूक्ष्मजंतुंची प्रयोगशाळेमध्ये निर्मिती करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करणे हा उपाय महत्वाचा ठरेल. सर्वांनी प्लॅस्टिकचा वापर मर्यादित ठेवण्याबरोबरच प्लॅस्टिकची निर्मिती व त्याची मागणी कमी कशी करता येईल यावर विचार करावा लागेल. समाजामध्ये स्वच्छता ठेवणारे व प्लॅस्टिक कचरा वेचणारे खरे देवदूत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

न्यायाधीश सुधाकर यारलागड्डा यांनी आपल्या भाषणात म्हणाले की प्लॅस्टिकने आपले जीवन भौतिक वस्तुंनी सुखाचे बनविले असले तरी शारिरीकदृष्ट्या विविध आजारांनी ग्रस्त असे दुःखदायकसुध्दा बनविले आहे. यावर दुसरा कोणीतरी उपाय करेल हा दृष्टिकोन न ठेवता तुम्ही स्वतः पासून याची सुरुवात करा. घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणाऱ्यांनी प्लॅस्टिकचा कचरा स्विकारु नये त्याऐवजी नागरीकांनी साठविलेला प्लॅस्टिकचा कचरा विकत घेण्यासाठी गावागावांमध्ये व्यवस्था निर्माण व्हावी यामुळे प्लॅस्टिकचा प्रश्न बऱ्याचश्या प्रमाणात निकाली निघू शकतो असे ते म्हणाले. इंजि पी एस गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ दिलीप पवार यांनी केले. इंजि एम एम अनेकर यांनी इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स, अहमदनगर लोकल सेंटरच्या संस्थेविषयीची माहिती करुन दिली. भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने लोकअदालत तसेच जनतेच्या कायदेविषयक जाणीवा समृध्द करण्यासाठी आयोजीत करण्यात येणाऱ्या शिबिरांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि अभय राजे यांनी तर आभार डॉ अतुल अत्रे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ महानंद माने, इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स या संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page