शिवाजी विद्यापीठाचा गोखले इन्स्टिट्यूसमवेत सामंजस्य करार
धोरणनिश्चिती कार्यात सहभागासाठी उद्युक्त करणारा करार – कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
कोल्हापूर : धोरणनिश्चितीच्या कार्यात सहभागाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील संशोधक, अभ्यासकांना माहिती होण्याच्या दृष्टीने गोखले इन्स्टिट्यूटसमवेत होणारा सामंजस्य करार उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला. पुणे येथील नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेसमवेत शिवाजी विद्यापीठाचा काल सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, गोखले इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत बनसोडे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गोखले इन्स्टिट्यूसमवेत होणारा हा करार विद्यापीठाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. ज्ञानाचा वापर समाजासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करावा, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर धोरणकर्त्यांना मार्गदर्शन कसे करावे, याचा वस्तुपाठ या संस्थेने गेल्या अनेक वर्षांत घालून दिलेला आहे. धोरणनिश्चितीच्या कामी एखादी शैक्षणिक संस्था किती महत्त्वाचे योगदान देऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. अशा पद्धतीचे कार्य करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी यांना संस्थेकडून योग्य मार्गदर्शन घेता येईल. संस्थेचे ग्रंथालयही अनेक महत्त्वाच्या अहवालांनी समृद्ध आहे, त्या अहवालांचा अभ्यास करून अनुषंगिक संयुक्त संशोधन प्रकल्पही हाती घेता येऊ शकतील. सहकार क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमही राबविता येऊ शकतील. समाजासाठी उत्तम काम करण्याची संधी या कराराद्वारे उपलब्ध झाली आहे, तिचा संशोधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. प्रशांत बनसोडे म्हणाले, गोखले इन्स्टिट्यूटने सुरवातीपासूनच अनेक सामाजिक-आर्थिक महत्त्वाच्या विषयांवर संशोधन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थानिक विद्यापीठांशी सहकार्य करून त्या माध्यमातून स्थानिक समस्यांचे विश्लेषण करून त्यांच्या निराकरणाचे उपाय सुचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाशी होणारा करार महत्त्वाचा आहे. दोन्ही संस्थांना संयुक्तरित्या संशोधन समस्येची निवड करून त्यावर काम करता येईल. गेल्या पाच वर्षांत संस्थेने विविध ४० संशोधन प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्य शासनाच्या महाउन्नत अभियानाच्या अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संस्थेत इंटर्नशीपही करता येईल. त्याखेरीज संस्थेच्या संशोधन पद्धतीशास्त्रावरील सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासारखे विविध अभ्यासक्रमही करता येतील. ज्ञानाचे आदानप्रदान आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठी अभिनव मार्ग शोधण्यासाठीही काम करणे शक्य आहे.
या सामंजस्य करारावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. बनसोडे यांनी तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. या सामंजस्य कराराचे समन्वयक तथा समाजशास्त्र अधिविभागाचे डॉ. जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, समाजशास्त्र अधिविभागातील शिक्षक डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. पूजा पाटील, कोमल ओसवाल, आकाश ब्राह्मणे आदी उपस्थित होते.