डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बजाज हॉस्पिटलसमेवत सामंजस्य करार
आरोग्यविषयक संशोधन, आदान प्रदान होणार
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार उभय संस्थांमध्ये आरोग्यविषयक संशोधन, फॅकल्टी एक्स्चेंज, हेल्थ चेकअप व ओरिएंटेशन करण्यात येणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सभागृहात दोन्ही संस्थांप्रमुखांमध्ये गुरुवारी (दि २९) बैठक होऊन या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यात ’मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर’, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. तर मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ट्रस्ट संचलित कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्यासमवेत गुरुवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
यावेळी प्रकुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, डॉ कुणाल दत्ता तसेच बजाज हॉस्पिटलचे सीईओ जॉर्ज नोएल फर्नांडिस, मेडिकल डायरेक्टर डॉ अजय रोटे, सिनिअर फिजिशियन डॉ मिलिंद वैष्णव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ विजय फुलारी यांची भेट घेऊन चर्चा केली. या करारांतर्गत आरोग्यविषयक संशोधन, फॅकल्टी एक्स्चेंज, हेल्थ चेकअप व ओरिएंटेशन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक शिक्षणाच्या संधी वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आजच्या स्पर्धात्मक जॉब मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान, कौशल्ये विद्यार्थ्यांना सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केलेले विशेष व्यावसायिक अभ्यासक्रम ऑफर करून शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. या भागीदारीअंतर्गत आरोग्य विषयक विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाची पाऊल असणार आहे.