सोलापूर विद्यापीठ आणि भारतीय सचिव संस्था यांच्यात सामंजस्य करार
कॉमर्स व मॅनेजमेंट विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी होणार फायदा
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन संकुल आणि भारतीय सचिव संस्था, नवी दिल्ली यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार झाला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी फायदा होणार आहे. कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षरी झाल्या.
मंगळवारी, विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामध्ये कराराचा कार्यक्रम झाला. यावेळी करारावर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेचे कौन्सिल मेंबर पवन चंडक यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ शिवाजी शिंदे, भारतीय कंपनी सचिव संस्थेचे अधिकारी समीर सिद्धेश्वर, विशाल पाटील, ईशान पाध्ये आदींचे प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉ आर एस मेंथे यांनी केले.
कुलगुरू प्रा महानवर यावेळी बोलताना म्हणाले की, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम व कौशल्यभिमुख ज्ञान देण्यासाठी विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील राहते. अशाच प्रकारे आज भारतीय कंपनी सचिव संस्था यांच्यासोबत करार झाला. विद्यार्थ्यांच्या उज्वल करिअर तसेच व्यावसायिक जीवनात वावरताना विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख ज्ञानाची गरज भासते. त्यासाठीच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांशी निगडित विविध नाविन्यपूर्ण स्किल कोर्सेस सुरू करण्यासाठी अशा संस्थांशी करार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याचा विद्यार्थ्यांना त्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भारतीय सचिव संस्थेचे पवन चंडक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय शिक्षण संस्था काम करते, असे सांगून त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा वनिता सावंत व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल हुल्ले यांनी केले तर आभार प्रा इम्तियाज सय्यद यांनी मानले.