राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि समता फाउंडेशन दरम्यान सामंजस्य करार
समता फाउंडेशनच्या सहकार्याने कौशल्य निर्माण
नागपूर : समता फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या कौशल्यात वाढ केली जाणार आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने समता फाउंडेशन सोबत सामंजस्य करार (MoA) केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित एका कार्यक्रमात समंजस्य कराराला मूर्त रूप देण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ निशिकांत राऊत, एनर्जी व टेक्नोलॉजी पार्कचे संचालक डॉ. प्रकाश ईटनकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सहायक संचालक डॉ. समित माहोरे, पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे, वाणिज्य विभागाच्या डॉ. अपर्णा समुद्रा तसेच समता फाउंडेशनच्या शिक्षण शाखेच्या प्रमुख सौ. प्रियंका मुंडे, रवींद्र गर्जें उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत्रात येत असलेल्या नागपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा येथील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांसाठी आयटी आणि फॅशन डिझाइनचे प्रमाणपत्र आणि प्रगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकविले जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त होणार आहे. याकरिता समता फाउंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार (MoA) करण्यात आला आहे. या कराराद्वारे सध्या ५,००० हून अधिक विद्यार्थी या अभ्यासक्रमांचा लाभ घेत आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल आणि त्यासोबतच स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी व्यक्त केला.