महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांच्यात सामंजस्य करार

डिजिटल आरोग्य शिक्षणाला चालना देण्यासाठी सदर करार महत्वाचा – केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात प्रभावी सेवा देण्यासाठी डिजिटल आरोग्य शिक्षणाला चालना देणारा हा करार महत्वपूर्ण भुमिका पार पाडेल असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांच्यात नुकताच परस्पर सामंजस्य करार करण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा व विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सीईओ दीप्ती गौर मुखर्जी, केंद्रीय आरोग्य सचिव डॉ अपूर्व चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी संागितले की, वैद्यकीय अभ्यासक्रमात डिजिटल आरोग्य शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण आहे. आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत शिक्षणपध्दती जोडल्यास त्या प्रभावी असतील. समाजात प्रभावी आरोग्य सेवा परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी हा परस्पर सामंजस्य करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांचे कौशल्ये वाढीला लावणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या अंतर्गत व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करता येईल. यामुळे अधिक दर्जेदार सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन देणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या सामंजस्य करारामुळे आरोग्य कर्मचारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे राबवू शकतील. हा सामंजस्य करार केवळ त्यांची क्षमता वाढवण्याचा मार्ग मोकळा होईल तसेच देशातील डिजिटल शिक्षण क्षेत्रातही योगदान देईल असेही त्यांनी संागितले.

Advertisement

याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, डिजिटल आरोग्य समजून घेणे आणि रुग्णसेवेमध्ये त्याचा वापर करणे हे आजच्या युगात अत्यावश्यक आहे. सध्या डिजिटल आरोग्य क्षेत्र आघाडीवर आहे. विद्यापीठातर्फे आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल आरोग्य सुविधा सुरू करण्यात आली आहे. या परस्पर सामंजस्य कराराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर नॅशनल हेल्थ आथॉरिटी समवेत डिजिटल आरोग्य शिक्षणात क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, विद्यापीठाने डिजिटल आरोग्यातील परिचयात्मक अभ्यासक्रम म्हणून डिजिटल आरोग्य पायाभूत अभ्यासक्रम सुरू केले आहेत. वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर आणि अभ्यागतांकरीता डिजिटल हेल्थ फाऊंडेशन कोर्समध्ये क्लिनिकल प्रणालींची मूलभूत तत्त्वे, आरोग्यसेवा डेटा सुरक्षा आणि आरोग्यसेवा डेटा संचालनाचे महत्त्व आदींचा समावेश आहे. याचा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023 यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीच्या सीईओ दीप्ती गौर मुखर्जी यांनी सांगितले की, डिजिटल आरोग्य हे एक विकसित होणारे क्षेत्र आहे. याअनुषंगाने आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व विद्यार्थी व डॉक्टर यांच्यात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून देशात डिजिटल आरोग्य उपाययोजनां प्रभावी पध्दतीने गती देणे शक्य होईल. ज्यामुळे भविष्यातील आरोग्यसेवा अधिक तत्पर व कार्यक्षम असतील असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्वपूर्ण भुमिका पार पाडत असल्याने हा परस्पर सामंजस्य करार महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील निर्माण भवनात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत डिजिटल हेल्थ एज्युकेशनच्या अनुषंगाने परस्पर सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव डॉ अपूर्व चंद्र, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, कोइटा फाऊंडेशनचे संचालक आणि नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष रिझवान कोइटा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page