कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि स्वामी नारायण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि स्वामी नारायण विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करारावर गुरुवार दि.२२ फेब्रुवारी रोजी कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नैतिक मूल्यांवर भर देण्यात आला आहे. त्यादृष्टिने एकात्मिक व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामुळे नैतिक मूल्ये, आंतरिक चारित्र्य विकसित करण्यासोबत रचनात्मक आणि सर्जनशील विचार निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी उपयुक्त असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. व्हिडीओव्दारे तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, विद्यार्थी संवाद सत्र असे या अभ्यासक्रमाचे स्वरुप राहणार आहे. एकात्मिक व्यक्तिमत्व अभ्यासक्रमासाठी क्रेडीट ट्रान्सफरची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वामी नारायण विद्यापीठाच्यावतीने कार्यपुस्तिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या सामंजस्य कराराच्यावेळी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व साहयर्च मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. चौधरी, धुळे येथील स्वामी नारायण मंदिर व छात्रालयाचे विश्वस्त निरंजनभाई दवे, भाविनभाई रवासिया, डॉ. प्रवीणभाई पाटील, चंदनभाई सोनार हे उपस्थित होते.