भारतीय उष्ण कटिबंधीय मौसम विज्ञान संस्था व शिवाजी विद्यापीठात सामंज्यस्य करार

कोल्हापूर : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिटूट ऑफ ट्रॉपीकल मेट्रॉलॉजी (आय.आय.टी.एम.) या आघाडीच्या संस्थेसमवेत शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे हवामानविषयक आधुनिक संशोधनाच्या अनुषंगाने दोन्ही संस्थांमध्ये आदान प्रदान होणार आहे. शिवाजी विद्यापीठात काल (दि. २०) कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा मुख्य उद्देश दोन्ही संस्थामध्ये सहयोगी संघटन स्थापन करणे हा आहे. याचा दोन्ही संस्थामधील पुढील संशोधन कार्यासाठी परस्पर फायदा होणार आहे.

भारतीय उष्ण कटिबंधीय मौसम विज्ञान संस्था

आयआयटीएम ही देशातील एक प्रमुख वैज्ञानिक संशोधन संस्था आहे. ही संस्था हवामान आणि हवामान अंदाज सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या महासागरीय वातावरण प्रणालीच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने संशोधनकार्य करत आहे. हि संस्था भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

या कराराच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरात आणि पन्हाळा येथील विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्र परिसरात वेदर स्टेशन बसवण्यात येणार आहेत. पुढे टप्प्याटप्प्याने या स्टेशनची संख्या वाढविण्यात येईल. याचा लाभ वातावरणातील तापमान, पर्जन्य, आर्द्रता अशा विविध घटकांचे मोजमाप करण्यासाठी होणार आहे. आजकाल ग्लोबल वॉर्मिंग, हवामानातील बदल यामुळे महापूर, दुष्काळ, दरडी कोसळणे आदी अनेक नैसर्गिक संकटे येताना दिसतात. या कराराच्या माध्यमातून अशा विविध बाबींविषयी दोन्ही संस्थांमध्ये संशोधन केले जाईल आणि आवश्यक त्या माहितीचे आदान प्रदानही केले जाईल.

Advertisement

या कराराचा लाभ विद्यापीठातील सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टॅनॅबिलिटी स्टडीज्, भूगोल, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र अधिविभागांसह संगणक विभागासही होईल. याखेरीज दोन्ही संस्थांमधील संशोधक, विद्यार्थी हे आदानप्रदान पद्धतीने दोन्ही संस्थांमध्ये संशोधन करू शकतील.

सामंजस्य करारावर आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रबारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच हवामान बदल व शाश्वतता अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर उपस्थित होते. इंडियन इन्स्टिटूट ऑफ ट्रॉपीकल मेट्रॉलॉजी यांच्या वतीने शास्त्रज्ञ (जी) डॉ. एस. डी. पवार, शास्त्रज्ञ (एफ) डॉ. एम. एन. पाटील आणि डॉ. टी. धर्मराज, भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दादा पी. नाडे, डॉ. सोमनाथ पवार, डॉ. राजीव व्हटकर, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. राणी पवार, डॉ. अभिजीत पाटील व सुधीर पोवार उपस्थित होते.

‘हवामान बदलाच्या अनुषंगाने उपयुक्त संशोधनाला बळ देणारा करार

शिवाजी विद्यापीठाने हवामान बदल व शाश्वतता अभ्यास केंद्राची स्थापना करून हवामान बदलाच्या अनुषंगाने संशोधनावर गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित केले आहे. विद्यापीठाने हवामान बदलाबाबत निर्धारित केलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने सदरचा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही संस्थांमध्ये संशोधन व आदानप्रदान सहकार्य वृद्धिंगत होऊन उपयुक्त संशोधनाला बळ देणारा ठरेल. विद्यापीठातील विविध अधिविभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठीही मोठा फायदा होईल, असे मत कुलगुरू डॉ. दिगंबर शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page