गोंडवाना विद्यापीठ आणि हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्यात सामंजस्य करार

सामंजस्य करारातून भारतीय ज्ञान परंपरेला चालना मिळणार

कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आणि हिंदू धर्म संस्कृती मंदिर, नागपूर यांच्यातील सामंजस्य करारामुळे भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासाला आणि संशोधनाला मोठी संधी मिळणार आहे. या करारानुसार, विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधक हे नागपूर येथील हिंदू धर्म संस्कृती मंदिरातील 40 हजारपेक्षा जास्त प्राचीन ग्रंथांचा आणि हस्तलिखितांचा अभ्यास करू शकतील. या करारामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय साहित्य, संस्कृती आणि ज्ञान परंपरेवर संशोधन करण्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध होईल. तसेच, हिंदू धर्म आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल.

त्यामुळे या सामंजस्य करारातून भारतीय ज्ञान परंपरेला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी केले गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि हिंदू धर्म संस्कृती मंदिर, नागपूर यांच्यामध्ये सांमजस्य करार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी, प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन, अधिष्ठाता डॉ अमुदाला चंद्रमौली, हिंदू धर्म संस्कृती मंदिराचे अध्यक्ष मनोज वाघ, विश्वस्त प्रसन्न चितळे, डॉ सुधाकरराव इंगळे, ज्ञान स्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ रजनी वाढई तसेच प्राध्यापक डॉ विवेक जोशी, डॉ देवदत्त तारे, डॉ नंदकिशोर माने, डॉ प्रफुल नांदे, डॉ प्रिया गेडाम, संदीप कागे, डॉ वैभव मसराम, अतुल गावस्कर, डॉ हेमराज निखाडे तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Advertisement

करारामध्ये दोन्ही संस्था परस्पर हित असलेल्या क्षेत्रात संयुक्त संशोधन करतील. विद्यापीठ आणि मंदिर एकमेकांना शैक्षणिक संसाधने प्रदान करतील. दोन्ही संस्थांच्या संशोधकांचा आदान-प्रदान कार्यक्रम राबविला जाईल. संयुक्तरीत्या परिषदा, कार्यशाळा, चर्चासत्र, परिगोष्ठी आणि स्पर्धांचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये घेतलेल्या अभ्यासक्रमांचे श्रेयांकाचे हस्तांतरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या धोरणानुसार, हिंदू धर्म संस्कृती मंदिराला त्यांच्या प्रकाशनांसाठी आर्थिक सहकार्य प्रदान केले जाईल. यामुळे मंदिराला त्यांच्या मौल्यवान ग्रंथांचे जतन आणि प्रकाशन करण्यासाठी मदत मिळणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यवस्थापन सभागृह येथे सदर सांमजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव तसेच हिंदू धर्म संस्कृती मंदिरच्या वतीने अध्यक्ष मनोज वाघ यांनी स्वाक्षरी केली. सामंजस्य कराराची भूमिका मनोज वाघ यांनी मांडली. हिंदू धर्म संस्कृती मंदिराच्या स्थापनेचे उद्दिष्ट व आढावा सांगून दुर्गम भागातील संशोधक विद्यार्थ्यांना या प्राचीन ग्रंथाचा लाभ मिळेल या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन ज्ञान स्रोत केंद्राच्या संचालिका डॉ रजनी वाढई तर आभार हिंदू धर्म संस्कृती मंदिरचे विश्वस्त डॉ सुधाकरराव इंगळे यांनी केले.

या करारामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page