एमजीएम विद्यापीठात मोटिव्हेशनल स्पीकर साजन शहा यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि सातत्य आवश्यक – साजन शहा
छत्रपती संभाजीनगर : आपण आपल्या जीवनात शिस्त आणि आपण करीत असलेल्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवले तर आपण स्वत:ला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाऊ शकतो, असे प्रतिपादन मोटिव्हेशनल स्पीकर साजन शहा यांनी येथे केले.
एमजीएम विद्यापीठाच्या वतीने रुक्मिणी सभागृह येथे साजन शहा यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, एमजीएम रुग्णालय व महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ प्रविण सूर्यवंशी, एमजीएम स्कूलच्या संचालिका डॉ अपर्णा कक्कड, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना साजन शहा म्हणाले, जीवनात मोठी स्वप्ने पाहणे आवश्यक असून आपण पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. आपण पाहत असलेली स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे झोकून देऊन काम करणे गरजेचे असते. आपण अपेक्षित उंचीवरुन मार्गक्रमण करीत असताना आपले पाय जमिनीवर ठेवायला पाहिजेत आणि आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द आपल्यात असायला हवी.
विद्यापीठात संपन्न झालेल्या या विशेष प्रेरणादायी सत्रानंतर साजन शहा यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा आरती साळुंके यांनी मानले.