अमरावती विद्यापीठात ‘प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृति ग्रामगीता व्याख्यानमाला संपन्न
राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श गांव उभ व्हावं – डॉ सुभाष पाळेकर
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वप्नातील आदर्श गांव उभ व्हावं, असे प्रतिपादन डॉ सुभाष पाळेकर यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समिती, अमरावती यांच्याकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृति ग्रामगीता व्याख्यानमालेचे’ श्री वसंतराव नाईक सभागृह, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ येथे ‘राष्ट्रसंतांना अभिप्रेत ग्रामगीतेतील शेती आणि समृध्दी’ या विषयावर आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ ललितकुमार निमोदीया, सदस्य देवकिसनजी शर्मा, प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम केंद्रीय समिती अध्यक्ष मधुभाऊ घारड, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा, ननसा संचालक डॉ अजय लाड उपस्थित होते.
डॉ पाळेकर पुढे म्हणाले, आजघडीला नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे जीवन जगता यावे असे कौशल्ययुक्त शिक्षण आज विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. शेतीतूनही आपल्याला उत्पन्न काढता येते, परंतु त्यासाठी देखील आपली तयारी असली पाहिजे. शेतीसाठी सुध्दा आज आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. मानवाची जागा यंत्राने घेतली असली, तरी प्रगत होण्यासाठी देखील ते आवश्यक आहे. असे असे असले, तरी शेतकरी समृध्द होईल असे तंत्रज्ञान कृषी विद्यापीठांनी शोधले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ पाळेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
ते म्हणाले, शेतकरी स्वावलंबी झाला, तर गाव स्वावलंबी होईल. यासाठी शेती तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब केला पाहिजे. विषयुक्त फळे, भाजीपाला, अऩ्नधान्य, रासायनिक खताच्या अतिवापरामुळे मानवी जीवन रोगाचे धन झाले आहे. विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यानी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या संस्कृतीचं जतन करा, त्याची सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे, असे सांगून आदर्श गांवे निर्माण होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने कार्य करावे, तेव्हाच त्यांच्या स्वप्नातील गांव पूर्णत्वास येईल.
राष्ट्रसंतांना अपेक्षित ग्रामोन्नती व्हावी – प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे
अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे म्हणाले, राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेली ग्रामोन्नती झाली पाहिजे. आत्मनिर्भर भारस निर्माण करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. अपेक्षित बदल घडवायचे असतील, तर त्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात करा, असे आवाहन देखील याप्रसंगी डॉ महेंद्र ढोरे यांनी केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ ललितकुमार निमोदीया व वनराईचे अध्यक्ष मधुभाऊ घारड यांनी मनोगत, तर जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी प्रास्ताविक केले. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनंत सूर्यकार यांनी, तर आभार डॉ किशोर बुटले यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, मोकदम कुटुंबातील सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भाविक भक्त, गणमान्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.