बदलत्या शिक्षणव्यवस्थेसाठी आधुनिक अनुदेशन पद्धती आवश्यक; शिवाजी विद्यापीठात तज्ज्ञांचे मार्गदर्शन
देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज – प्रा. डॉ. किरणकुमार शर्मा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभागामार्फत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत “प्रगत अनुदेशन पद्धती” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. ३० व ३१ जानेवारी रोजी करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. किरणकुमार शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. शर्मा यांनी देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाचा प्रभावी उपयोग करण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्यनिर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. बदलत्या सामाजिक गरजा लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीमध्ये नव्या दृष्टिकोनातून सुधारणा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रगत अनुदेशन पद्धतीचे महत्त्व आणि आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याची भूमिका स्पष्ट केली.
या दोन दिवसीय कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. नितीन पाटील, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईचे डॉ. महेश कोलतामे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षणशास्त्र विभागाचे डॉ. वैभव जाधव, एमआयटी-एडीटी विद्यापीठ पुणे येथील डॉ. प्रिया सिंग तसेच शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. एम. पी. भिलावे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी समारोप प्रसंगी कार्यशाळेचा इतिवृत्तांत सादर केला, तर सहसमन्वयक म्हणून सारिका पाटील यांनी कार्य पाहिले. सूत्रसंचालन बी.एड.-एम.एड. (एकात्मिक) प्रशिक्षणार्थी आकांक्षा पाटील, प्रांजली भोंग आणि किशोर शाम यांनी केले.
या कार्यशाळेस शिक्षणशास्त्र अधिविभागातील डॉ. रुपाली संकपाळ यांच्यासह शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विविध शैक्षणिक संस्थांमधील एकूण ७४ प्रतिसादकांनी सहभाग नोंदवून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
