मिल्लीया महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आवश्यक – पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळात सुद्धा प्राविण्य मिळवावे – प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 17 फेब्रुवारी 2024 शनिवार रोजी संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. बंकटस्वामी महाविद्यालय बीडचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ,अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव खान सबीहा मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस. एस., पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रोफेसर फरीद अहमद नेहरी यांची उपस्थिती होती. नॅक समन्वयक डॉ.अब्दुल अनीस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, आपली क्षमता, कौशल्य दाखवण्याचे खेळ व विविध स्पर्धा हे एक चांगले माध्यम असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळात सुद्धा प्राविण्य मिळवावे असे सांगितले.
प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी खेळ व अभ्यास यामध्ये संतुलन ठेवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव खान सबीहा मॅडम यांनी महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करते, विविध शैक्षणिक सुविधा बरोबरच विद्यार्थी एक चांगला व्यक्ती व्हावा, त्याने समाज निर्मितीसाठी सहभाग घ्यावा यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे, शिक्षण हे अमूल्य असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा योग्य उपयोग करावा. उच्च शिक्षण घ्यावे तसेच एक चांगला व्यक्ती होण्यासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार होणे आवश्यक आहे तसेच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा असे सांगितले. जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्था, परभणी यांच्या वतीने संस्थेच्या सचिव खान सबीहा मॅडम यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे, संस्थेच्या सचिव व प्राचार्य यांच्या हस्ते याद-ए-रफतगान या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, तिरंदाजी,100, 300, 800 मीटर धावण्याच्या स्पर्धा, गोळाफेक, थाळी फेक, कॅरम, बुद्धिबळ, स्लो सायकलिंग, रस्सीखेच, लंगडी, संगीत खुर्ची, मेहंदी, मेकअप स्पर्धा, इत्यादी यामध्ये यशस्वी विद्यार्थी -विद्यार्थिनी यांना बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. जनरल ट्रॉफी बीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी शेख शोएब शेख खलील याला देण्यात आली. आभार नॅक समन्वयक डॉ. अब्दुल अनीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.