एमजीएम विद्यापीठाच्या संघाने ‘टेक्नोवर्स हॅकाथॉन’ स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने पुणे येथे कॉग्निझंट कंपनी आयोजित ‘टेक्नोवर्स हॅकाथॉन’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. एमजीएमच्या ‘हॅक इलाईट्स’ या विजेत्या संघातील अभिषेक खत्री, कुणाल वाघ, वंशिता जोशी आणि मिसबाह काझी या विद्यार्थ्यांनी फुफ्फुसाची क्षमता वाढवणारा एक नावीन्यपूर्ण प्रकल्प या राष्ट्रीय स्पर्धेत सादर केला. या स्पर्धेत देशभरातील ६० संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.

विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रातील एक क्रांतिकारी बदल असून या माध्यमातून श्वासोच्छवासाची समस्या असणाऱ्या बालकांचे जीवन अधिक सुखकर बनण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या माध्यमातून बालकांच्या फुफ्फुसाची क्षमता वाढण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना वापरुन या प्रयोगाची निर्मिती केलेली आहे.

Advertisement

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एमजीएम जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रथम पारितोषिक मिळविणे ही निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे. एमजीएमचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे नाव करीत असून ही आम्हां सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी केल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ एच एच शिंदे यांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. एमजीएम ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ परमिंदर कौर धिंग्रा यांनी या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page