महात्मा गांधी मिशन विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातारणात संपन्न
समृद्ध मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर होणे आवश्यक – कुलगुरू डॉ. विलास सपकाळ
छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असून आपल्या अभिव्यक्तीमध्ये मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपली मातृभाषा समृद्ध असून तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा मराठी भाषा विभाग, एमजीएम रेडिओ ९०.८ व भाषा संचालनालय विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित काव्यवाचन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ ( दि .२७ ) विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, कुलगुरू डॉ.सपकाळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी, भाषा संचालनालय विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे संचालक बाबासाहेब जगताप, अधिष्ठाता प्राचार्य डॉ. रेखा शेळके, प्रसिद्ध कवी डॉ. ललित आधाने, प्राध्यापक, साहित्यिक प्रेमी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. ललित आधाने यांनी आपली ‘बाजार’ नावाची कविता सादर केली. तसेच यावेळी त्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेवर प्रकाश टाकला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.रेखा शेळके म्हणाल्या, मराठी भाषा ही अस्तित्व आणि अस्मिता जोपासणारी भाषा आहे. मराठी भाषेमुळे आज आपण चांगल्या पद्धतीचे साहित्य वाचू शकतो. विशेषत: मराठी भाषेतील अभिजात साहित्यांचे वाचन केल्यामुळे मानवी व्यक्तिमत्त्वात सुधारणा होते. मराठी साहित्य समृद्ध करण्यामध्ये कुसुमाग्रज यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली असून साहित्य हे समाजमनाचा आरसा असते.
यावेळी झालेल्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये शहरातील व शहराबाहेरील ग्रामीण महाविद्यालयातील ७० विद्यार्थी व कवी स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये रितिका वसंत शेळके, रक्ताटे चैत्राली व स्नेहल विष्णू अकोलकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करीत बक्षीसावर आपले नाव कोरले.
एमजीएम मधील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना कवी व लेखक होण्यासाठी ललित लेख व कविता लेखन स्पर्धा आयोजित केली होती. ललित लेख स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डॉ. भागवत वाघ, द्वितीय क्रमांक मंजुश्री लांडगे, तर तृतीय क्रमांक संस्कृती तहकिक यांनी मिळविला. तसेच काव्यलेखन स्पर्धेमध्ये विठ्ठल खंडागळे – प्रथम, अमृता राऊत- द्वितीय ,तर डॉ. रेहान सय्यद यांनी तिसरा क्रमांक मिळवला. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. जिजा शिंदे व डॉ. रेखा सलगर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता राऊत यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. मारोती गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमजीएम रेडिओ केंद्र संचालक सुनील शिरसीकर , डॉ. राम गायकवाड, आरजे अदनान, आरजे मनीषा व अश्विनी निटूरकर यांनी परिश्रम घेतले.